नागपूर : हुडकेश्वर पोलिसांनी घरफोडीच्या तीन गॅंग एकाच वेळी पकडत 13 आरोपीना अटक केली. तर साडेनऊ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल माल जप्त केला. महत्त्वाचं म्हणजे यात तीन महिलांचा सुद्धा समावेश आहे.
हुडकेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत मोठ्या प्रमाणात घरफोडीच्या घटना वाढल्या होत्या. मात्र चोरटे पोलिसांच्या हाती लागत नव्हते. पोलिसांनी वेगवेगळ्या प्रकारे तांत्रिक पद्धतीने तपास सुरू केला. पोलिसांच्या हाती तीन टोळ्या लागल्या. पोलिसांनी एकएक कळी जोडत तिन्ही टोळींना पकडण्यात यश मिळवलं. या सगळ्या गॅंग नागपूर आणि आसपासच्या परिसरात चोऱ्या करत होते. पोलिसांनी यात मोठ्या प्रमाणात सोन्या-चांदीचे दागिने आणि इतर साहित्यसुद्धा जप्त करण्यात यश मिळविलं. सोबतच एकूण 13 आरोपींना अटक केल्याचं एसीपी गणेश बिरादार यांनी सांगितलं.
चोरीच्या घटना वाढल्याचं लक्षात येताच ठिकठिकाणी सभा घेण्यात आल्या. लोकांमध्ये जनजागृती करण्यात आली. दागिने घरी ठेऊ नका. लॉकरमध्ये ठेवा जेणेकरून चोरी होणार नाही, असं सांगण्यात आलं. संशयित व्यक्ती दिसल्यास पोलिसांना माहिती द्यावी, असं आवाहन करण्यात आलं. त्यासाठी बॅनर्स लावण्यात आल्याचं बिरासदार यांनी सांगितलं.
झोन 4 चे पोलीस उपायुक्त नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनात श्री. नेहते व डीबीची टीमनं चांगली कामगिरी केली आहे. डीबी टीमचे प्रमुख स्वप्निल भुजबळ व त्यांच्या टीमनं 15 गुन्हे शोधून काढले. यापैकी चार चोरट्यांनी 12 ठिकाणी गुन्हे केले होते. त्यांचे तांत्रिक लोकेशन शोधण्यात आले. या चार चोरांमध्ये दोन नागपूरचे तर दोन भंडारा येथील आहेत. त्यांच्याकडून कॅमेरा, डीव्हीआर, दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या. शिवाय सहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं.
दुसऱ्या एक घटनेत ऑटोचालक आणि तीन महिलांना अटक करण्यात आली आहे. या महिला ऑटोत बसणाऱ्या महिलेला बोलण्यात गुंतवून तिच्या पर्समधील दागिने लंपास करीत होत्या. कन्हानच्या तीन महिला आणि चालक यांना अटक केली. त्यांच्याकडून एक लाख ५४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.