नागपूर शहराच्या प्रवाशांसाठी 438 बस धावणार!, मनपा परिवहन समितीच्या अंदाजपत्रकात नेमकं काय?
नागपूर नगरीचे मुख्य आकर्षण हे भारताचे झिरो माईल स्टोन. झिरो माईल हे आता हरित व पर्यावरण पुरक करण्याच्या दृष्टीने परिवहन समितीच्या वतिने परिवहन उपक्रमाच्या तेथील राखीव जागेवर ई-बसकरिता पथ अंत्योदय इलेक्ट्रिक बस आगार (चार्जिंग स्टेशन) उभारण्यात येणार आहे. नागपूरच्या प्रवाशांसाठी 438 बस धावणार आहेत.
नागपूर : महापालिकेच्या परिवहन समितीचे वार्षिक अंदाजपत्रक (Annual Budget) समिती सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे यांनी स्थायी समिती (Standing Committee) सभापती प्रकाश भोयर यांच्याकडे गुरुवारी सुपूर्द केले. अर्थसंकल्पात 2022-23 चे उत्पन्न 384 कोटी 77 लाख रुपये अपेक्षित आहे. तसेच या आर्थिक वर्षात 384 कोटी 55 लाख रुपये इतका खर्च होईल. 15 व्या वित्त आयोगाच्या अंतर्गत 2020-21 करिता 51 कोटी 68 लाख रुपये, 2021-22 करिता 25 कोटी 84 लाख रुपये असा एकूण 77 कोटी 52 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. 2022-23 करिता 27 कोटी 40 लाख रुपये निधीदेखील मंजूर करण्यात आला आहे. एकूण मंजूर निधी 104 कोटी 92 लाख रुपये निधीपैकी वाठोडा येथील डेपोच्या (Depot at Vathoda) कामाकरिता 8 कोटींची तरतूद वगळता 96 कोटी 92 लाख रुपये तरतूद इलेक्ट्रिक बस खरेदीसाठी करण्यात आलेली आहे.
50 टक्के बस इलेक्ट्रिक
2022-23पर्यंत 104.92 कोटी मधून 233 मिडी बसेस खरेदी करणे प्रस्तावित आहेत. 2021-22 पर्यंत प्राप्त 77 कोटी 52 लाख रुपयांमधून पहिल्या टप्प्यात 115 इलेक्ट्रिक बसेस वेटलिजवर खरेदी करण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात प्राप्त निधीतून अंदाजे 100 इलेक्ट्रिक बस खरेदी करणे प्रस्तावित आहे. यातून 2022-23 या वर्षात नागपूर शहरात आपली बसच्या माध्यमातून नागरिकांच्या सेवेसाठी 50 टक्के बस या इलेक्ट्रिक बसेस रस्त्यावर धावतील. तसेच वाठोडा येथील 10 एकर जागेवर नवीन डेपो तयार करण्यात येणार आहे.
यावर्षात 145 कोटींची मागणी
2022-23 या वर्षाकरिता 145 कोटी रुपये निधीची मागणी केली आहे. मनपाला आतापर्यंत प्राप्त होत असलेल्या 108 कोटी अनुदानात 37 कोटी रुपये ज्यादा निधी आवश्यक आहे. 2022-23 च्या अंदाजपत्रकात 145 कोटी रुपये निधीची मागणी करण्यात आली. 2022-23 या आर्थिक वर्षात डीजल/सीएनजी इंधनावर चालणाऱ्या स्टॅन्डरर्ड, मिनी, मिडी बस मिळून एकूण 262 बस धावणार आहेत. तसेच स्मार्ट सिटी तर्फे 15 इलेक्ट्रिक बस, केंद्र शासनाकडून 40 मिडी इलेक्ट्रिक बस व पर्यावरण विभाग, महाराष्ट्र शासनाकडून 115 इलेक्ट्रिक मिडी बस प्राप्त होणार आहे. महिलांकरिता संचालनात असणाऱ्या तेजस्विनी 6 इलेक्ट्रिक बस मिळून 438 बस संचालनात राहील.