आदित्य ठाकरे भडकले, उद्वेगाने म्हणाले, या सरकारचं करायचं तरी काय?
तिसरा मुद्दा हा शेतकऱ्यांचा आहे. तीन महिन्यापूर्वी पाऊस पडला. राज्याच्या काही भागात ओला दुष्काळ झाला. पण अजूनही या सरकारने शेतकऱ्यांना कोणताही मदत केली नाही.
नागपूर: हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. आधी हे सरकार घटनाबाह्य होतं. आता घाबरटही झालं आहे. कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी धमकी येताच शिंदे-फडणवीस सरकारमधील दोन मंत्र्यांनी कर्नाटकाला जाणचं रद्द केलं. असं हे घाबरट सरकार असून या सरकारचं करायचं तरी काय? असा संतप्त सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे. तसेच हिवाळी अधिवेशनात राज्यसरकारला विविध प्रश्नांवर घेरणार असल्याचा मनसुबाही त्यांनी जाहीर केला आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशन तापणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.
आदित्य ठाकरे यांनी विधानभवन परिसरात आल्यानंतर मीडियाशी संवाद साधला. यावेळी कर्नाटकाच्या मुद्द्यावर बोलताना राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर हल्ला चढवला. हे सरकार घाबरट सरकार आहे. कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांची धमकी येताच दुसऱ्या मिनिटाला सरकारमधील दोन मंत्र्यांनी कर्नाटकात जायचं रद्द केलं. मग अशा सरकारचं करायचं तरी काय?, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.
हे ना महाराष्ट्राचं सरकार आहे. हे घटनाबाह्य सरकार आहे. हे सरकार लवकरच कोसळणार आहे. हे बेकायदेशीर सरकार आता घाबरट सरकारही झालं आहे, असा हल्ला आदित्य यांनी चढवला.
महाराष्ट्रात अनेक मुद्दे आहेत. पहिला मुद्दा सीमाभागावर सरकारकडून काही बोललं जात नाही. कर्नाटक या मुद्द्यावर आक्रमक आहे. पण आपलं घटनाबाह्य सरकार काहीच बोलत नाही, या मुद्द्यावरून आम्ही सरकारला धारेवर धरणार आहोत.
दुसरा मुद्दा हा महाराष्ट्रातील प्रकल्पांचा आहे. महाराष्ट्रातून पळवून नेण्यात आले आहेत. त्यावर उत्तर आलं नाही. या मुद्द्यावर मीडियामध्ये येऊन माझ्याशी चर्चा करावी, असं चॅलेंजच मी महाराष्ट्रातील घटनाबाह्य सरकारला केलं होतं. पण त्याला त्यांचा प्रतिसाद दिला नाही, असं ते म्हणाले.
तिसरा मुद्दा हा शेतकऱ्यांचा आहे. तीन महिन्यापूर्वी पाऊस पडला. राज्याच्या काही भागात ओला दुष्काळ झाला. पण अजूनही या सरकारने शेतकऱ्यांना कोणताही मदत केली नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यावर आम्ही आवाज उठवू, असंही ते म्हणाले.
नागपूरच्या कोणत्या प्रश्नावर सरकारला घेणार? असा सवाल आदित्य यांना करण्यात आला. त्यावर, आम्ही आंदोलन करू. पायऱ्यावर उभं राहू. पण हे सरकार कोणाचं ऐकत नाही. कोणत्याही जिल्ह्याचं ऐकत नाही, असा संतापही त्यांनी व्यक्त केला.