Nagpur budget | प्रशासक सादर करणार नागपूर मनपाचा अर्थसंकल्प; कसा असणार यंदाचा अर्थसंकल्प? राजकीय पक्षांच्या नजरा
यंदाच्या अर्थसंकल्पातून कायमस्वरुपी उत्नन्नाचे स्त्रोत तयार करण्याचे काम केले जाईल. मनपाची आर्थिक स्थिती विचारात घेता निर्णय घ्यावा लागेल. सध्या सुरू असलेले प्रकल्प पूर्ण कसे होतील, यासाठी मनपा आयुक्तांना प्रयत्न करावे लागतील.
नागपूर : महापालिकेचा 2022-23 चा अर्थसंकल्प ( budget) लवकरच मांडला जाणार आहे. यंदाचा अर्थसंकल्प हा प्रशासक (Administrator) सादर करणार आहेत. मनपा पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपल्यानं सर्व अधिकार प्रशासकाच्या हातात आहे. प्रशासक म्हणून मनपा आयुक्त राधाकृष्णन बी (Commissioner Radhakrishnan b) काम पाहत आहेत. यंदाचा अर्थसंकल्प हा पारदर्शक व गतीमान प्रशासनाची अपेक्षा असलेला राहण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी दोन हजार 607 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मनपा आयुक्तांनी सादर केला होता. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष प्रकाश भोयर यांनी यामध्ये 189 कोटी रुपयांची वाढ केली होती. त्यामुळं गेल्या वर्षीचा अर्थसंकल्प हा दोन हजार 796 कोटी रुपयांचा झाला होता. परंतु, महापालिकेच्या तिरोजीत अपेक्षित महसूल जमा झाला नाही. यंदा हा अर्थसंकल्प दोन हजार सहाशे ते सातशे कोटींच्या जवळपास राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नगर रचना विभागाचे उत्पन्न चांगले
गेल्या वर्षी स्थायी समितीने दोन हजार 796 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता. मालमत्ता करातून 332 कोटी रुपये महसूल मिळतील, असा अंदाज होता. पण, प्रत्यक्षात 215 कोटी रुपये जमा झाले. 117 कोटी रुपये उत्पन्न कमी झाले. नगर रचना विभागाचे 106 कोटी रुपये उत्पन्न गृहित धरले होते. प्रत्यक्षात 175 कोटी जमा झाले. नगर रचना विभागाने चांगले उत्पन्न दिले. पण, पाणीपुरवठा व इतर विभागांकडून फारसे उत्पन्न मिळाले नाही.
नागरी सुविधांना द्यावे लागणार प्राधान्य
मनपात सध्या स्टेशनरी घोटाळा गाजत आहे. या पार्श्वभूमीवर रस्ते, फुटपाथ, उड्डाणपूल, जलवाहिन्या, मलनिस्सारण, परिवहन, विद्युतीकरण, उद्यान, विकास, शिक्षण आदी नागरी सुविधांची पूर्तता करावी लागेल. हे सर्व करताना मनपा आयुक्तांना चांगलीच कसरत करावी लागले, असे दिसते. कायमस्वरुपी उत्नन्नाचे स्त्रोत तयार करण्याचे काम केले जाईल. मनपाची आर्थिक स्थिती विचारात घेता निर्णय घ्यावा लागेल. सध्या सुरू असलेले प्रकल्प पूर्ण कसे होतील, यासाठी मनपा आयुक्तांना प्रयत्न करावे लागतील.