शनिवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेटले, सोमवारी माझ्या बडतर्फीचा निर्णय, आशिष देशमुख यांनी सांगितलं

| Updated on: May 26, 2023 | 3:10 PM

सोनिया गांधी यांनी मला दिल्लीला बोलावून घेतले. त्यांनी मला सांगितले की, तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात लढा.

शनिवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेटले, सोमवारी माझ्या बडतर्फीचा निर्णय, आशिष देशमुख यांनी सांगितलं
Follow us on

गजानन उमाटे, प्रतिनिधी, नागपूर : विदर्भाचे व्यापक हित बघून पुढची राजकीय वाटचाल ठरविणार आहे. असं मत काँग्रेसमधून निलंबित झालेल्या आशिष देशमुख यांनी प्रसिद्धीपत्रक काढून व्यक्त केलं. आशिष देशमुख म्हणाले, माझ्या कुटुंबाच्या रक्तात काँग्रेस आहे. माझा जन्म होण्याच्या आधीपासून काँग्रेसशी आमचे नाते आहे. २०१८ मध्ये २८८ आमदारांपैकी फक्त एका आमदाराने राजीनामा दिली होता. तो म्हणजे माझा भाजपमधून आमदारकीचा राजीनामा होता. सोनिया गांधी यांनी मला दिल्लीला बोलावून घेतले. त्यांनी मला सांगितले की, तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात लढा. सर्वांना माहीत आहे की, काँग्रेसच्या आणि त्यातल्या त्यात नागपूरमधील कॉंग्रेसच्या लाथाळ्या या जगजाहीर आहेत. माझ्या दिमतीला कोणीही नसताना एकहाती लढत मी फडणवीसांना दिली. भरपूर मते मला मिळाली, असंही आशिष देशमुख यांनी म्हंटलं.

यावर अजून निर्णय घेतला नाही

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संपूर्ण संविधान मी वकिलांकडे बसून चाळले. जर मी कोर्टात गेलो तर माझी बडतर्फी राज्याची शिस्तपालन समिती करू शकत नाही, हे सिद्ध करता येईल. पण हे करायचे की नाही यावर मी अजूनपर्यंत निर्णय घेतला नाही.

राहुल गांधी, त्यानंतर सोनिया गांधी असताना अध्यक्षपदाचे दालन ४ वर्षे उघडले नाही. प्रदेशाध्यक्षांची तक्रार करण्यासाठी मी गेलो होतो. त्याच्या ३ दिवस आधी ते उघडले होते. दमट वास तिथे दरवळत होता. राष्ट्रीय स्तरावर काँग्रेसचे जे मुख्य सूत्र आहे आणि जी परिस्थिती आहे ती अत्यंत बिकट आणि कमजोर झालेली आहे. त्यातच महाराष्ट्र राज्य काँग्रेसचे जे नेतृत्व आहे ते खरं-खोटं रेटत चालले आहे.

हे सुद्धा वाचा

 

राहुल गांधी यांनी माफी मागितली असती तर…

काँग्रेसचा ओबीसी जनाधार तेव्हापासून वेगाने कमी झाला. आज त्यामुळे काँग्रेस पक्षाची दयनीय अवस्था झालेली आहे. मी म्हटल्याप्रमाणे राहुल गांधी यांनी माफी मागितली असती तर त्यांना खासदारकी सोडावी लागली नसती. माझ्या सूचनेप्रमाणे ओबीसी समाजाची माफी मागून राहुल गांधी यांना ताजा विषय संपवता आला असता, असंही आशिष देशमुख यांनी सांगितलं.

‘चौकीदार चोर है’ किंवा राफेलच्या संदर्भात राहुल गांधींनी सर्वोच्च न्यायालयात बिनशर्त माफी मागितली होती. परंतु, येथे भारताच्या एकूण लोकसंख्येच्या ५४% ओबीसींचा प्रश्न आहे. राजकीय भविष्यासाठी त्यातून एक चांगला मार्ग काढायचा असेल तर राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाची माफी मागावी, असे मी म्हटले तर त्यात गैर काय?

म्हणून सोमवारी बडतर्फीचा निर्णय

माझ्या घरी २० मे २०२३ (शनिवार) ला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे नाश्त्याकरिता आले. त्यानंतर रविवारी समितीच्या ऑफिसला सुट्टी होती. त्यामुळे मला सोमवारी, म्हणजे २२ मे २०२३ ला अवैध बडतर्फीचा निर्णय घेऊन पत्र पाठविले.

या निर्णयावर पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर कोणाचे तरी दडपण असावे. काही संबंध राजकारणाच्या पलीकडचे असतात. मागील २० वर्षांपासून फडणवीस आणि बावनकुळे यांच्याशी आमचे कौटुंबीक संबंध आहेत, असंही आशिष देशमुख यांनी सांगितलं.