“शाह आणि बोम्मईंसोबतच्या बैठकीत नेमकं काय घडलं? जाहीर करा”, अजित पवार यांची मागणी
महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळाव्याला कर्नाटक सरकारने परवानगी नाकारली, विरोधक एकवटले...
नागपूर : महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद (Maharashtra Karnataka Seemavad) आता चिघळत चालला आहे. विधीमंडळ अधिवेशनातही याचे पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं. विधिमंडळ अधिनेशनादरम्यान विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. या प्रश्नासंदर्भात सरकारची भूमिका काय हे स्पष्ट करावी, असं अजित पवार (Ajit Pawar) म्हणालेत.
शाहांसोबत काय चर्चा?
काही दिवसांआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चर्चा झाली.यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे देखील उपस्थित होते. या बैठकीत सीमाप्रश्नावर चर्चा झाली आणि महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्यांना अडवण्यात येणार नाही, असं सांगण्यात आलं पण आता राज्यातील नेत्यांची अडवणूक केली जातेय. त्यामुळे या चर्चेदरम्यान नेमकी काय चर्चा झाली, याची माहिती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर करावी, असं अजित पवार म्हणालेत.
महामेळाव्याला परवानगी नाकारली
महाराष्ट्र एकीकरण समितीचा आज महामेळावा होणार होता. या मेळाव्याला कर्नाटक सरकारने परवानगी नाकारली आहे. या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर जमाव बंदीचा आदेशही देण्यात आला आहे. या महामेळाव्यासाठी तयार करण्यात आलेलं व्यासपीठ पोलिसांनी हटवलं आहे. या स्टेजवरचं साहित्यही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या विरोधात विरोधक आक्रमक झालेत. त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला आहे.
धैर्यशील माने यांचा बेळगाव दौरा रद्द
महाराष्ट्र एकीकरण समितीने आज बेळगावमध्ये महामेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला खासदार धैर्यशील माने यांना अध्यक्ष म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं. धैर्यशील माने यांनी आपण बेळगावला जाणार असल्याचं सांगितलंही होतं. मात्र आता त्यांचा हा बेळगाव दौरा अखेर रद्द झाला आहे. धैर्यशील माने यांना कानडी भाषेत पत्र आलं. त्यातून त्यांना प्रवेश नाकारल्याचं सांगण्यात आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी काल रात्री उशिरा झालेल्या चर्चा केल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यावर आता आक्रमक प्रतिक्रिया येत आहेत.