परिस्थिती बदलतेय… तुम्ही म्हातारे होण्याच्या आधीच दिसेल की… मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?
आम्ही राष्ट्रवाद नाही तर राष्ट्रीयतेचा विचार करतो. विभिन्नतेत एकता आहे. जो हिॅदू नाही तो म्हणतो आमचं खरं बाकीचं सगळं चुकीचं आहे. भारत विविधतेला मानतो. हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले.
नागपूर | 7 सप्टेंबर 2023 : भारताला इंडिया म्हणण्याऐवजी भारत म्हणा. इंडिया या शब्दाचा उल्लेख करू नका. त्याचा वापर करू नका, असा सल्ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिला होता. भागवत यांच्या या सल्ल्यानंतर देशात इंडिया शब्द संविधानातून हटवण्याच्याच हालचाली सुरू झाल्या. भागवत यांच्या या विधानावर अनेक प्रतिक्रियाही उमटल्या. त्यानंतर भागवत यांनी आता आणखी एक नवं विधान केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.
सरसंघचालक मोहन भागवत यांनी अखंड भारताबाबत विधान केलं आहे. योग्य दिशेने काम केले तर तुम्ही म्हातारे होण्याच्या आधीच तुमचं स्वप्न साकार झालेलं दिसेल. जे लोक भारतापासून वेगळे झाले त्यांना चूक केल्याचं वाटतं. भारताचा हिस्सा बनावं असं त्यांना वाटत आहे. त्यामुळे त्यांना भारताचा स्वभाव स्वीकारण्याची गरज आहे, असं मोहन भागवत म्हणाले. येथील एका कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना त्यांनी हे विधान केलं.
सीमारेषा पुसल्या की…
भारताला अखंड भारत कधी होणार हे मी सांगू शकत नाही. मी ज्योतिष नाही. तुम्ही प्रयत्न केला तर होईल. जे भारतापासून वेगळे झालं ते म्हणतात आम्ही चुकलो. आम्हाला परत यायचं आहे. पण सिमारेषा पुसणे म्हणजे एक होणे नाही. त्यांचा स्वभाव एक झाला तर सारा भारत एक होईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
लोकांनी प्रश्न विचारू नये
1950 ते 2002 पर्यंत संघाने आपल्या मुख्यालयावर तिरंगा फडकवला नाही,या प्रश्नावरही त्यांनी उत्तर दिलं. आम्ही 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी रोजी जिथेही असतो तिथे तिरंगा फडकवत असतो. नागपूर महाल आणि रेशीमबागेत दोन्ही ठिकाणी ध्वजारोहण होत असते. लोकांनी आम्हाला हा प्रश्न विचारू नये, असंही भागवत म्हणाले.
झेंडा अडकला अन्…
यावेळी त्यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांचा एक किस्सा सांगितला. जवारललाल नेहरुंनी पहिल्यांदा तिरंगा फडकवला. पण तो अडकला होता. त्याची सोडवणूक संघाच्या स्वयंसेवकाने केली. तेव्हा नेहरु त्या मुलाचा गौरव करणार होते. पण तो संघाच्या शाखेत जात होता. पहिल्यांदा तिरंगा फडकवला त्यात अडचणी आल्या. तेव्हा संघ स्वयंसेवक पुढे आले. जेव्हा जेव्हा तिरंगा संकटात आला तेव्हा आमचा स्वयंसेवकाने जीवाची पर्वा न करता तिरंग्याची शान राखली. जिथे राष्ट्रध्वजाचा प्रश्न आहे, तेव्हा पहिल्यांदा संघ स्वयंसेवक पुढे जातो, असंही त्यांनी सांगितलं.