अकोला : विधान परिषदेची अकोला-वाशिम-बुलढाणा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची झाली आहे. या निवडणुकीच्या व्यवस्थापनासाठी थेट नागपूर , मुंबई येथून भाजपच्या वरिष्ठांनी सूत्रे हातात घेतली. वैयक्तिक व्यवस्थापन थेट वसंत खंडेलवाल यांच्या हातात आहे. स्थानिक पातळीवरचे त्यांचे वैयक्तिक नेटवर्क या कामात गुंतले आहे.
असे असताना वंचित बहुजन आघाडीची मते या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहेत. जिल्हा परिषदेत गेल्या काळात झालेल्या सभापतीच्या निवडणुकीत वंचितला महाविकास आघाडीने धूळ चारली होती. त्या कुरघोडीच्या राजकारणाचा मोठा परिणाम या निवडणुकीवर पडणार असल्याचे चित्र आहे. अकोला-वाशिम-बुलढाणा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीचे मतदान 10 डिसेंबरला मतदान होणार आहे. 14 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. या मतदारसंघावर गेली चार टर्म सलग शिवसेनेचे वर्चस्व आहे.
यातील तीन टर्म शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरिया विजयी झाले आहेत. आता यावेळी गोपीकिशन बाजोरिया हे सलग चौथ्यांदा निवडणूक रिंगणात उतरले आहेत. ते महाविकास आघाडीचे संयुक्त उमेदवार आहेत. अकोल्यातील उद्योजक आणि नितीन गडकरी यांचे कट्टर समर्थक वसंत खंडेलवाल यांच्याशी थेट बाजोरिया यांची लढत होणार आहे. ही लढत वसंत खंडेलवाल विरोधात बाजोरिया अशी नसून, ती थेट नितीन गडकरी विरोधात उद्धव ठाकरे अशी होणार आहे. त्यामुळं या लढतीकडे भाजपच्या वरिष्ठांचे लक्ष लागले आहे. गेली तीन टर्म बाजोरीयांच्या कौशल्यातून शिवसेनेच्या ताब्यात हा मतदार संघ आहे. बाजोरिया सध्या विधान परिषदेत शिवसेनेचे पक्ष मुख्य प्रतोद आहेत.
विधान परिषद निवडणुकीत विजय संपादन करण्याचे कौशल्य व चाणक्य म्हणून बाजोरियाकडे पाहिले जाते. यंदा मात्र थेट गडकरी वाड्यातून उमेदवार निश्चित झाल्याने भाजपच्या नेत्यांना देखील जोर लावावा लागत आहे. त्यामुळं बाजोरिया यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यात वंचित बहुजन आघाडीला जिल्हा परिषदेमध्ये सभापती निवडणुकीत धूळ चारल्याने वंचित महाविकास आघाडी सोबत जाण्याची सुतराम शक्यता नाही. भाजपाकडून ठोस आश्वासन घेतच वंचित भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची शक्यता राजकीय वर्तुळात आहे. अकोला जिल्हा परिषद, वाशिम जिल्ह्यातील कारंजा, मंगरूळपीर आणि बुलढाणा नगरपालिका वंचितच्या ताब्यात आहेत. या तीनही जिल्ह्यांत वंचितच्या मतदारांची संख्या 60 च्या वर आहे. मंगरुळपीरच्या नगरसेवकांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला आहे. त्याचा फटका वंचितांच्या एक गठ्ठा मतदाराला बसतो की तेदेखील वंचितच्या व्हीपप्रमाणे मतदान करतात. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या निवडणुकीत बुलढाणा जिल्ह्यात सर्वाधिक मतदार आहेत. त्या मतदारांच्या आधारावर या निवडणुकीतील विजय सुनिश्चित होणार आहे. दरम्यान अकोला व वाशीम जिल्ह्यात देखील मतदारांची संख्या चांगली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मतदार कुणाला पाठिंबा देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या 18 वर्षातली ही विधान परिषदेची निवडणूक चुरशीची होत आहे. उद्याला मतदान होणार असून 3 जिल्ह्यातल्या 22 मतदान केंद्रांवर 822 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. त्यामुळं या निवडणुकीत कोण बाजी मारते याकडे अकोला, बुलढाणा, वाशिम या तीनही जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.