गजानन उमाटे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नागपूर | 23 सप्टेंबर 2023 : कालपर्यंत सर्व काही व्यवस्थित सुरू होतं. वाहनांची येजा सुरू होती. बस स्टॉपवर बस पकडण्यासाठी प्रवाशांची प्रचंड गर्दी होती. रस्त्यावर फेरिवाले बसत होते. घरातही सर्वजण हसून खेळून होते. कुणी टीव्ही बघत होतं, कुणी अभ्यास करत होतं, तर कुणी मस्त चिकन, मटनावर ताव मारत होतं. मध्य नागपुरातील म्हणजे सीताबर्डी परिसरातील हे कालपर्यंतचं दृष्य होतं. मात्र, आज या भागात इतकं पाणी साचलंय इतकं पाणी साचलंय की बस स्टॉप पाण्याखाली गेलाय. ढगफुटीमुळे संपूर्ण परिसराला नदीचं स्वरुप आलं आहे. त्यामुळे कालचा तो हाच परिसर का? असा प्रश्न पडल्या वाचून राहत नाही. इतका हाहा:कार या पावसाने माजवला आहे. त्यामुळे नागपूरकर हवालदिल झाले आहेत.
नागपूरमध्ये गेल्या दोन दिवसापासून रिमझिम पाऊस सुरू होता. काल संध्याकाळनंतर पावसाने अधिकच जोर धरला. रात्री तर विजांच्या कडकडाटासह ढगफुटी सारखा पाऊस पडला. त्यामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला. या तलावाचे पाणी नागपूरच्या मध्यवर्ती भागात म्हणजे सीताबर्डी परिसरात भरलं आहे. एखादी नदी वाहावी इतक्या प्रचंड प्रमाणात तलावाचं पाणी सीताबर्डी परिसरात वाहत आहे. वस्त्यावस्त्यांमध्ये हे पाणी शिरलं आहे. घराघरात पाणी शिरल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. कुणाचं सिलिंडर वाहून गेलंय तर कुणाची भांडीकुंडी वाहून गेली आहेत. घरातील गद्यांपासून फर्निचरपर्यंत सर्वांचीच वाट लागली आहे.
मोरभवन बस स्टॉपला तर नदीचं स्वरूप आलं आहे. बस स्टॉपमध्ये चार ते पाच फुटापर्यंत पाणी साचलं आहे. या पुराच्या पाण्यात 8 ते 10 एसटी अडकल्या आहेत. बस पाण्यात अडकल्याने वाहक आणि चालकांनी एसटीच्या टपावर जाऊन आश्रय घेतला. रात्रभर हे वाहक आणि चालक एसटीच्या टपावर होते. सात ते आठ जण एसटीच्या टपावर अडकून पडले आहेत.
त्यांना बाहेर काढण्याचा युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे. दोरीच्या सहाय्याने त्यांना बाहेर काढलं जात आहे. याच बस स्टॉपच्या बाहेर पुलाखालीही प्रचंड पाणी भरलं आहे. त्यामुळे पुलाखाली अनेक कार अडकून पडल्या आहेत. पावसामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे. नागपूरमध्ये इतर भागातही हीच परिस्थिती ओढवली आहे.
शहरात मोठ्या प्रमाणावर पाणी भरल्याने आणीबाणीसारखी स्थिती निर्माण झाली आहे. अग्निशमन दलाचे जवान मदत कार्य करत आहेत. तर जिल्हाधिकाऱ्यांनीही घटनास्थळी येऊन पाहणी केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तात्काळ मदतकार्य करण्याचे आदेश दिले आहेत.
नागपुरात काल रात्री मुसळधार पावसामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाल्याने काही भागात पाणी शिरले आहे. अवघ्या 4 तासात 100 मिमीपेक्षा अधिक पाऊस झाल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी मला दिली.नागपूर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त हे घटनास्थळी पोहोचले असून तातडीने आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. सखल भागात अडकलेल्या नागरिकांना आधी तातडीने मदत करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. एनडीआरएफची एक आणि एसडीआरएफच्या 2 चमू बचाव कार्यात तैनात करण्यात आल्या आहेत. सातत्याने प्रशासनाशी संपर्कात असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत, असं देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.