EXCLUSIVE | तर दोन वर्षापूर्वीच महाविकास आघाडीचं सरकार पडलं असतं; अनिल देशमुख यांच्या विधानाने खळबळ
विदर्भातील प्रत्येक विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघात ओबीसींची निर्णयाक मते आहेत. भाजपकडे असलेला ओबीसी मतदार आपल्याकडे वळावा म्हणून राष्ट्रवादीचे प्रयत्न आहेत.
नागपूर : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अत्यंत मोठं आणि धक्कादायक विधान केलं आहे. तुरुंगात असताना माझ्याकडे दोन वर्षापूर्वी प्रस्ताव आले होते. तेव्हा मी समझोता केला असता तर माझ्यावर कारवाई झाली नसती. पण दोन वर्षांपूर्वीच महाविकास आघाडीचं सरकार पडलं असतं, असं मोठं विधान अनिल देशमुख यांनी केलं आहे. देशमुख यांच्या या विधानाने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. टीव्ही9 मराठीशी बोलताना अनिल देशमुख यांनी हे विधान केलं आहे.
मी तुरुंगात जाण्याचा त्रास सहन केला. मी खोटे आरोप कुणावर करावेत हे मला सांगितलं गेलं. पण मी समझोता करण्यास नकार दिला. कुणावरही खोटे आरोप करणार नाही, असं स्पष्टपणे सांगितलं. त्यामुळे मला हे भोगावे लागलं, असा गौप्यस्फोट अनिल देशमुख यांनी केला आहे.
भाजपकडून दबाव होता
अनेक कारणांमुळे ईडीचा त्रास सुरू आहे. आमच्याविरोधात बोललं, भाषण केलं, भूमिका घेतली, तर त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. जयंत पाटील यांनीही त्यांच्यावर भाजपकडून दबाव होता असं स्पष्ट केलं, असंही त्यांनी सांगितलं.
राष्ट्रवादीचे ओबीसींकडे लक्ष
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने विदर्भातील ओबीसी मतदारांवर आपलं लक्ष केंद्रीत केलं आहे. त्यासाठी येत्या 3 आणि 4 जून रोजी नागपुरात राष्ट्रवादीने ओबीसी शिबिराचं आयोजन केलं आहे. या शिबिराला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि जितेंद्र आव्हाड येणार आहेत. यावेळी ते ओबीसी नेते आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.
विदर्भातील प्रत्येक विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघात ओबीसींची निर्णयाक मते आहेत. भाजपकडे असलेला ओबीसी मतदार आपल्याकडे वळावा म्हणून राष्ट्रवादीचे प्रयत्न आहेत. आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर नागपूरात राष्ट्रवादीचं ओबीसी शिबीर पार पडणार आहे. ओबीसी समाज विदर्भात मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे या शिबिराला नामवंत वक्ते येऊन मार्गदर्शन करणार आहे. ओबीसीतून कार्यकर्ता घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे, असंही त्यांनी सांगितलं.
संजय राऊत यांचा दावा
दरम्यान, अनिल देशमुख यांच्या दाव्यावर संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अनिल देशमुख यांना कोणता दबाव आणि ऑफर होती याचे त्यांच्याकडे पुरावा आहे. त्यांच्याकडे व्हिडीओ क्लिप आहेत. त्यांना कोणी भेटून ऑफर दिली, कोण त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र घेऊ इच्छित होतं याची सर्व माहिती माझ्याकडे आहे. या संदर्भात अनिल देशमुख यांच्याशी माझं अनेकदा बोलणंही झालं आहे. एवढेच नव्हे तर शरद पवार यांनाही देशमुख यांनी काही पुरावे दाखवले आहेत, असा दावा संजय राऊत यांनी केला.