Nagpur | पशुसंवर्धन मंत्र्यांनी केली गारपीटग्रस्त भागाची पाहणी; सुनील केदार यांनी काय केल्यात घोषणा?
अवकाळी पाऊस आणि गारपीटग्रस्त भागाची पाहणी पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी केली. मृताच्या कुटुंबीयास चार लाख देण्याची घोषणा त्यांनी केली. शिवाय लोकप्रतिनिधी व शासकीय यंत्रणेने समन्वयातून काम करावे. अशा सूचना दिल्यात.
नागपूर : अवकाळी पाऊस व गारपीट अशा नैसर्गिक आपत्तीमुळे नागपूर जिल्ह्यातील अनेक गावांना तडाखा बसला आहे. या भागाची पाहणी गुरुवारी पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार (Sunil Kedar) यांनी केली. यावेळी लोकप्रतिनिधी व शासकीय यंत्रणेने समन्वयात काम करुन आपत्तीग्रस्तांना मदत करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी त्यांनी नागपूर तालुक्यातील बोखारा गावास प्रथम भेट देऊन नैसर्गिक आपत्तीत मृत पावलेल्या हेमंत रोशन निवते यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांचे आस्थापूर्वक विचारपूस करुन सांत्वन केले. मृत मुलगा दुग्ध वाटपाचे काम करत होता. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयास पशुसंवर्धन विभागाच्या योजनेतून गाय व म्हशी देण्यासोबत सानुग्रह अनुदान म्हणून चार लाख रुपये देण्याची घोषणा पशुसंवर्धन मंत्री (Animal Husbandry Minister) सुनील केदार यांनी केली. शासकीय योजनेतून गुरांचा गोठा मंजूर करण्याच्या सूचना त्यांनी गटविकास अधिकारी व तहसीलदार यांनी दिल्या. त्यासोबत पोलीस विभागाने तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
नुकसानग्रस्तांना मदत करा
आकस्मित निसर्गाचा कोपामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. राज्यशासनातर्फे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे. राज्य शासनातर्फे मदतीचा हात नक्कीच मिळेल. सर्वे करताना शेतकऱ्यांचे खऱ्या अर्थाने नुकसान झाले आहे, त्यांना मदत करा. त्यासोबत ग्रामीण भागातील गरीब व झोपडीपट्टीतील लोकांचेही नुकसान झाले आहे. त्याचाही सर्वे करा. जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत सदस्यांनी या कामात शासकीय यंत्रणेला सर्वे करण्यासाठी सहकार्य करावे. लोकप्रतिनिधी व शासकीय यंत्रणेने समन्वयाने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. या दौऱ्यात त्यांनी नागपूर तालुक्यातील बोखारा, गुमथळा, बैलवाडा, कामठी तालुक्यातील गुमथी, लोणखैरी, सावनेर तालुक्यातील दहेगाव(रं), पारशिवणी तालुक्यातील इटगाव, भागीमहारी, रामटेक तालुक्यातील जमुनीया, टुयापार, घोटी, फुलझरी या गावातील अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे हानी झालेल्या शेताची पाहणी केली.
सर्वाधिक फटका तुरीला
जिल्ह्यात जवळपास 7 हजार 431 हेक्टर क्षेत्रांमध्ये कापूस, गहू, हरभरा, तूर, उन्हाळी भुईमुग, भाजीपाला व संत्रा व टमाटर या फळपिकांचे नुकसान झाले आहे. 8 हजार 334 खातेधारकांना या अवकाळी पावसाचा फटका बसला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या अवकाळी पावसाने सर्वाधिक फटका तुरीला बसला असून दीड हजार हेक्टरमधील तुरीचे नुकसान झाले आहे. या भागाचे पंचनामे तात्काळ करण्यात येणार आहेत. त्याची नुकसानभरपाई आपतग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर देण्यात येईल, असे सांगून शासन शेतकऱ्यांच्या सदैव पाठीशी अशी ग्वाही केदार यांनी दिली. या दौऱ्यात त्यांच्यासमवेत जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुमित्रा कुंभारे, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती तापेश्वर वैद्य, जि.प. सदस्य कुंदा राऊत, प्रकाश खापरे, राजू कुसुबे, दुधाराम सव्वालाखे, शांता कुमरे, उपविभागीय अधिकारी इंदिरा चौधरी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश भोयर तसेच पंचायत समितीचे सभापती, सदस्य, अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.