Chandrapur | कुठेही थुंकत असाल तर सावध व्हा! थुंकणे पडले चारशे रुपयांना; दोन तासांची कोठडी
सार्वजनिक ठिकाणी थुंकणार्यांवर कठोर कारवाई करण्याची तरतूद आहे, असे असतानाही अनेकजण सार्वजनिक ठिकाणी थुंकतात. अशांवर निर्बंध घालण्यासाठी न्यायालयाच्या आदेशानुसार महानगरपालिकेच्या माध्यमातून कारवाई केली जात आहे.
चंद्रपूर : विदर्भात खर्रा खाऊन कुठेही थुंकणारे बरेच आहेत. नोकरीवर असतानाही काही कर्मचारी खर्रा खातात नि थुंकतात. पण, हे थुंकणे चंद्रपुरात दोघांना महागात पडले. महापालिकेनं थुंकणाऱ्यांना चारशे रुपयांचा दंड ठोठावला, तर मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी दोन तासांसाठी कोठडीत ठेवण्याची शिक्षा सुनावली.
काय आहे प्रकरण
दोन जण चंद्रपूर जिल्हा न्यायालय परिसरात गेले होते. तिथं फिरत असताना ते थुंकले. ही बाब लक्षात येताच काही जणांनी त्यावर आक्षेप घेतला. प्रकरण महापालिकेकडे गेले. महापालिकेच्या पथकानं दोघांनाही चारशे रुपयांचा दंड ठोठावला. ते एवढ्यावरच थांबले नाही, तर त्यांनी मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांकडे धाव घेतली. मुख्य न्याय दंडाधिकारी एस. एम. काळे यांनी दोघांनाही दोन तास कोठडी सुनावली.
सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर कारवाई
सार्वजनिक ठिकाणी थुंकणार्यांवर कठोर कारवाई करण्याची तरतूद आहे, असे असतानाही अनेकजण सार्वजनिक ठिकाणी थुंकतात. अशांवर निर्बंध घालण्यासाठी न्यायालयाच्या आदेशानुसार महानगरपालिकेच्या माध्यमातून कारवाई केली जात आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याच्या लोकांच्या सवयीला आळा घालण्यासाठी आणि मास्कची सवय लावण्यासाठी आता चंद्रपूर महानगरपालिका कठोर कारवाई करीत आहे.
न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई
सध्या कोरोनाचे संकट आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास कोविडचे विषाणू हवेत पसरून रोगराई पसरण्याची भीती असते. यवतमाळात खऱ्याच्या थुंकण्यातून कोरोनाचा फैलाव झाला होता. तरीही थुंकणारे याची पर्वा करताना दिसत नाही. सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना दंड आकारण्याच्या सूचना न्यायालयाने सात एप्रिल 2021 रोजी दिल्या होत्या. मदत व पुनर्वसन विभागाच्या 27 मार्च 2021 च्या आदेशान्वये थुंकणे व विनामास्क याबाबत कठोर दंड वसूल करण्यात येणार आहे.
सीसीटीव्हीच्या बाजूला जाऊन खर्रा
नागपूर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील गोष्ट. चार दिवसांपूर्वी तिथं जाण्याचा योग आला. एक पोलीस कर्मचाऱ्याला खर्रा खायचा होता. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या बाजूला गेला. नंतर खर्रा खाल्ला. सहकाऱ्यालासुद्धा दिला. जिल्हा पोलीस अधीक्षकांना कर्तव्यावर असताना आपण दिसू नये, यासाठी ते खबरदारी घेत होते. अशांना दंड कोण ठोठावणार?