नागपूर : महानगरपालिकेद्वारे शहरातील नागरिकांना विविध प्रकारच्या सेवा पुरविण्यात येतात. यात महत्वाची लोकांचा जीव वाचविण्याची सेवा अग्निशमन व आणीबाणी विभागाद्वारे देण्यात येते. शहरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र कार्य करणा-या अग्निशमन विभागाला अधिक सक्षम करण्यास मनपा कटिबद्ध असून त्यादृष्टीने कार्य करीत आहे. असे प्रतिपादन मनपा प्रशासक (Municipal Administrator) व आयुक्त राधाकृष्णन बी. (Radhakrishnan b.) यांनी केले. अग्निशमन व आणिबाणी सेवा विभागातर्फे अग्निशमन सेवा सप्ताहाच्या अनुषंगाने गुरुवारी (ता. 14) मनपा मुख्यालयातील हिरवळीवर अग्निशमन सेवा दिवस (Fire Service Day) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी मनपा आयुक्त व प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्यासह मान्यवरांनी अग्निशमन कार्य करताना प्राणाची आहुती देणारे शहीद गुलाबराव कावळे, शहीद प्रभू कुहीकर व शहीद रमेश ठाकरे या जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच अग्निशमन जवानांद्वारे देण्यात आलेली मानवंदना स्वीकारली.
अग्निशमन कार्य हे अतिशय जलद गतीने केले जाणारे कार्य आहे. स्वत:चा जीव जोखमीत घालून इतरांचा जीव वाचविण्याचे कार्य करावे लागते. जवानांची सुरक्षा राखली जावी यासाठी प्राधान्याने लक्ष दिले जात आहे. त्यादृष्टीनेच मनपाच्या नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात सर्वाधिक निधी अग्निशमन विभागासाठी देण्याचे आल्याचे मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सांगतिले. सुरक्षेच्या कार्यामध्ये असलेली जबाबदारी आणि जोखीम आपण स्वत: अनुभवली असल्याचेही ते म्हणाले. वाढती लोकसंख्या आणि शहरीकरणाचा भार लक्षात घेता अग्निशमन दलाची क्षमता वाढविण्याची गरज लक्षात घेऊन 100 पदभरतीचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. येणा-या काळात विभागाची क्षमता आणि वाढेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
इतरांच्या जीवाची सुरक्षा हातात असल्याने अग्निशमन जवानांनी इतरांच्या तुलनेत मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरूस्त असणे आवश्यक आहे. जवानांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष देऊन राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील अग्निशमन स्पर्धांमध्ये आपल्या कार्याची छाप सोडावी, असेही ते म्हणाले. अग्निशमन जनजागृतीसाठी जास्तीत जास्त जनजागृती अभियान राबविण्याचेही त्यांनी सूचित केले. मनपाचे अग्निशमन विभागाची सक्षमता सर उद्दिष्टाला प्राधान्य आहे. विभागाने त्या उद्दिष्टाच्या दृष्टीने कार्य करण्याचा आशावादही त्यांनी व्यक्त केला. प्रास्ताविकात मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांनी अग्निशमन सेवा सप्ताह आणि अग्निशमन सेवा दिनाची पार्श्वभूमी विषद केली. मनपाच्या अग्निशमन विभागाद्वारे करण्यात आलेल्या कार्याचीही त्यांनी माहिती दिली.