गडचिरोली | 4 नोव्हेंबर 2023 : भाजप खासदार अशोक नेते यांच्या गाडीचा मोठा अपघात झालाय. नागपूरहून गडचिरोलीकडे जात असताना वीरगाव गावाजवळ हा अपघात झालाय. सुदैवाने या भीषण अपघातातून अशोक नेते हे थोडक्यात बचावले आहेत. ते सुखरुप आहेत. पण त्यांच्या गाडीचं प्रचंड नुकसान झालंय. अशोक नेते गाडीतच होते. त्यांची गाडी गडचिरोलीच्या दिशेला जात असताना हा अपघात झाला. या अपघातात गाडीचं प्रचंड नुकसान झालंय. पण सुदैवाने या अपघातातून अशोक नेते हे थोडक्यात बचावले आहेत. ते सुखरुप असून आता गडचिरोलीला पोहोचल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
अशोक नेते हे भाजपचे गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. महायुतीची काल रात्री नुकतीच मुंबईत महत्त्वाची बैठक पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला महायुतीचे सर्व आमदार-खासदार आले होते. या बैठकीसाठी अशोक नेते हे सुद्धा मुंबईत गेले होते.
मुंबईतली बैठक आटोपून अशोक नेते रात्री उशिरा नागपूरला दाखल झाले होते. रात्री जास्त उशिर झाल्यामुळे ते आपल्या घरी गडचिरोलीला जाऊ शकले नाहीत. त्यांनी नागपुरात मुक्काम केला. त्यानंतर ते आज सकाळी त्यांच्या गाडीने नागपूरहून गडचिरोलीला निघाले होते. या दरम्यान आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास त्यांच्या गाडीचा अपघात झाला.
अपघाताची घटना घडली तेव्हा गाडीच्या एअरबॅग्ज निघाल्या. त्यामुळे गाडीत बसलेल्या कुणालाही कोणत्याही प्रकारची दुखापत किंवा नुकसान झालं नाही. सर्वजण सुखरुप आहेत. पण गाडीची अवस्था पाहिल्यावर गाडी किती वेगात होती याचा अंदाज येईल. सध्या खासदार त्यांच्या मतदारसंघात पोहोचल्याची माहिती समोर आली आहे.