Nagpur BJP | काँग्रेसच्या आंदोलनापूर्वीच भाजपचे कार्यकर्ते सज्ज, नागपुरात एकमेकांविरोधात घोषणाबाजी
नागपुरात आज भाजप-काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांविरोधात येतात की, काय असं चित्र होतं. नाना पटोलेंच्या आवाहनानंतर भाजपचे कार्यकर्तेही सज्ज झाले होते. काँग्रेसने संविधान चौकात, तर भाजपने आपल्या कार्यालयासमोर आंदोलन केलं.
नागपूर : पंतप्रधानांनी महाराष्ट्राचा अपमान केला, असा आरोप काँग्रेसच्या नाना पटोले (Nana Patole of Congress) यांनी केला. त्यानंतर त्यांनी काल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आंदोलन करण्याचे आवाहन केले होते. काँग्रेसचे कार्यकर्ते (Congress workers) भाजपच्या कार्यालयासमोर येऊ शकतात. त्यामुळं भाजपचे कार्यकर्ते आधीच धंतोली येथील भाजपच्या विभागीय कार्यालयासमोर तसेच महाल येथील शहर कार्यालयासमोर एकत्र आले होते. आम्ही हातात बांगड्या घातल्या नाही, आम्हीही त्यांना तोंड द्यायला तयार आहोत, असे म्हणत भाजपचे कार्यकर्ते (BJP workers) एकत्र आले. भाजपच्या कार्यकर्त्यांचे नेतृत्त्व मनपाचे सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे यांनी केले. दुसरीकडं, संविधान चौकात काँग्रेसने विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात आंदोलन केले. संविधान चौकात काँग्रेसचे कार्यकर्ते एकत्र आले. त्यांनी दुपारी उशिरा भाजपच्या विरोधात घोषणाबाजी केली.
नाना पटोले काय म्हणाले होते?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचा बुरखा फाडला. त्यामुळं काँग्रेसचे संतुलन बिघडले आहे, असा आरोप करत भाजपने काँग्रेसचे आंदोलन सुरू होण्यापूर्वीच आपल्या कार्यालयासमोर घोषणाबाजी केली. भाजपने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मुर्दाबादचे नारे दिले. काँग्रेसने ठिकठिकाणी शर्म करो मोदी या मथळ्याखाली आंदोलनाचा इशारा पत्रकार परिषदेतून पटोले यांनी काल दिला. तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही भाजप कार्यालयासमोर आंदोलन करा, अशा सूचना काँग्रेसचे पदाधिकारी यांना दिल्यात. काँग्रेसने याच पार्श्वभूमीवर नागपूरच्या संविधान चौकात आंदोलन पुकारले. मात्र त्या आधीच भाजपने आपल्या कार्यालयासमोर घोषणाबाजी केली.
काँग्रेसच्या आंदोलनात फूट
संविधान चौकातील काँग्रेसच्या आंदोलनात एकता दिसली नाही. ते गटातटात असल्याचे जाणवले. युवक एकीकडे, महिला दुसरीकडे आणि कार्यकर्ते तिसरीकडं अशाप्रकारे घोषणाबाजी करत होते. काँग्रेसचे फारसे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले नव्हते. याउलट, भाजपचे कार्यकर्ते एकत्र आले होते. त्यांना एकता दाखवत हम सब एक है चा परिचय या आंदोलनातून दिला. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकत्र आले असते, तर कदाचित आंदोलनाचे चित्र वेगळे झाले असते.