Vaccination | नागपुरात आजपासून फ्रंटलाईन वर्कर्सना बूस्टर डोस; आणखी कुणाकुणाचा समावेश?
विद्यार्थ्यांच्या लसीकरणासह नागपुरात बूस्टर डोस दिला जाणार आहे. आरोग्य सेवक, फ्रंटलाईन वर्कर्स तसेच साठ वर्षांवरील व्यक्तींचा यात समावेश राहणार आहे.
नागपूर : केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार नागपूर शहरात ३ जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. शहरात 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता फ्रंटलाईन वर्कर्स आणि 60 वर्ष व त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या व्यक्तींना बूस्टर डोस देणे आवश्यक आहे. त्यामुळे मनपातर्फे केंद्र सरकारच्या निर्णयाप्रमाने फ्रंटलाईन वर्कर्स आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी म्हणजेच 60 वर्ष आणि त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या व्यक्तींना 10 जानेवारी 2022 पासून बूस्टर डोस देण्यात येणार आहे. यासंदर्भात नियमावली जाहीर केली आहे. पात्र व्यक्तींना कोविन पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी आणि मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.
कोव्हिशील्ड लसीचे 119 स्थायी केंद्र
नागपूर महापालिकेकडून बूस्टर डोस देण्यासंदर्भात नियमावली जाहीर करण्यात आली आहे. येत्या 10 जानेवारीपासून आरोग्य कर्मचारी, कोव्हिडमध्ये आघाडीवर काम करणारे फ्रंटलाईन कर्मचारी आणि 60 वर्ष व त्यावरील वयाच्या सहव्याधी असलेल्या नागरिकांना लसीचे डोस देण्यात येणार आहेत. वरील सर्व जणांनी दुसरा डोस घेतल्याच्या तारखेपासून 9 महिने किंवा 39 आठवडे पूर्ण झाले असल्यास तिसऱ्या डोससाठी पात्र असतील. अशा पात्र 60 वर्षावरील नागरिकांसाठी कोव्हिशील्ड लसीचे 119 स्थायी केंद्र सुरु करण्यात आले आहे. तसेच या केंद्रात 18 वरील सर्व नागरिकांना कोव्हिशील्ड लसीचा पहिला आणि दुसरा डोस देण्यात येईल. तसेच कोव्हॅक्सीनसाठी 29 स्थायी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. ज्यांनी कोव्हॅक्सीन लस घेतली आहे अशा 60 वर्षावरील नागरिकांना बूस्टर डोज देण्यात येईल. तसेच या लसीकरण केंद्रांवर 15 वर्षावरील नागरिकांनासुद्धा पहिला व दुसरा डोस देण्यात येईल.
ऑनलाईन आणि नोंदणी पद्धतीने सुविधा उपलब्ध होणार
फ्रंटलाईन वर्कर्स आणि 60 वर्ष व त्यावरील वयाच्या सहव्याधी असलेल्या व्यक्तींना कोरोना लसीचा तिसरा डोस देण्यात येणार आहे. यासाठी पात्र व्यक्तींनी ऑनलाईन पद्धतीने कोविन पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. तिसरा डोस देताना लसीकरण केंद्रावर कोणतेही प्रमाणपत्र जमा किंवा दाखवायची आवश्यकता नाही, फक्त अशा व्यक्तींनी त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लसीकरणाबाबत निर्णय घ्यावा, असे मनपाच्या वतीने कळवण्यात आले आहे. सर्व नागरिकांना शासकीय केंद्रावर लसीकरण विनामूल्य होईल.