नागपुरातील सातपुडा वनस्पती उद्यानात बटरफ्लाय पार्क; योगा केंद्राव्यतिरिक्त काय असणार सुविधा?
नागपूरकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शहरवासीयांच्या उद्यान विभागात मोठी भर पडणार आहे. सातपुडा वनस्पती उद्यानात बटरफ्लाय पार्क राहणार आहे. याशिवाय आणखी विविध सुविधा राहणार आहेत.
नागपूर : फुटाळा तलावालगत कृषी विद्यापीठाचे वनस्पती उद्यान 58 एकरमध्ये पसरलेले आहे. या उद्यानाचा 26 एकर भाग विकसित आहे. उर्वरित भागाचा विकास करावयाचा आहे. उद्यानाच्या नूतनीकरणासाठी कृषिविद्यापीठाला (Agricultural University) अन्य संबंधित शासकीय विभागही (Government Department) मदत करीत आहेत. तसेच आयुक्त राधाकृष्णन यांनी डॉ. दिलीप चिंचमलातपुरे यांच्याकडून उद्यानात होणाऱ्या विकास कार्याबाबत माहिती जाणून घेतली. उद्यान विकासाच्या कामासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे सुद्धा मदत करण्यात येणार असल्याची माहिती राधाकृष्णन यांनी दिली. पर्यावरणवादी डॉ. दिलीप चिंचमलातपुरे (Dr. Dilip Chinchmalatpure) यांनी सांगितले की, सदर वनस्पती उद्यानात विविध प्रकारचे गुलाब, लिली यासारखी फुलांची झाडे मोठ्या प्रमाणात लावण्यात येणार आहेत. तसेच अम्युजमेंट पार्क, योग केंद्र अशा सुविधा सुद्धा असणार आहेत. यासोबतच फुटाळा तलावालगत बटरफ्लाय पार्क सुद्धा विकसित करण्याचे प्रयत्न असल्याचे डॉ. चिंचमलातपुरे यांनी सांगितले.
नितीन गडकरी यांची संकल्पना
नुकत्याच झालेल्या एका बैठकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या सातपुडा वनस्पती उद्यानाचे सौंदर्यीकरण व नूतनीकरणसाठी मदत करण्याचे निर्देश दिले होते. त्याअनुषंगाने मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सातपुडा वनस्पती उद्यानाची पाहणी केली. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेने व पुढाकाराने या उद्यानाचा विकास करण्यात येणार आहे.
अम्युझमेंट पार्कही उभारणार
या उद्यानात बटरफ्लाय पार्क, अम्युझमेंट पार्क तसेच योगा केंद्र राहणार आहे. याची पाहणी मनपा आयुक्तांनी केली. यावेळी मनपाचे अतिरिक्त आयुक्त दिपककुमार मीना, पर्यावरणवादी डॉ. दिलीप चिंचमलातपुरे, उपायुक्त रवींद्र भेलावे, उद्यान अधीक्षक अमोल चोरपगार, कृषी विद्यापीठाचे असोसिएट डीन डॉ. डी. एम. पंचभाई, कृषी विद्यापीठाचे प्राध्यापक आणि फलोत्पादन विभागाचे प्रमुख डॉ. रमाकांत गजभिये उपस्थित होते. नागपूरकरांसाठी ही आनंदाची बातमी आहे. शहरवासीयांच्या उद्यान विभागात मोठी भर पडणार आहे. सातपुडा वनस्पती उद्यानात बटरफ्लाय पार्क राहणार आहे. याशिवाय आणखी विविध सुविधा राहणार आहेत.