Nagpur ग्रामीण भागातील दिव्यांगांसाठी प्रमाणपत्र, वैश्विक ओळखपत्र विशेष मोहीम
नागपूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण, आरोग्य, शिक्षण विभाग, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र आणि इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जिल्हा सर्वोपचार रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोहीम राबविण्यात येत आहे. दिव्यांगत्व प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी दिव्यांगत्व प्रमाणपत्र विशेष मोहीम आहे.
नागपूर : जिल्ह्यात स्वावलंबन या ऑनलाईन पोर्टलद्वारे ऑनलाईन दिव्यांगत्व आणि वैश्विक ओळखपत्र (UDID Card) देण्यासाठी तपासणी व निदान विशेष शिबिरांचे आयोजन डिसेंबर 2021 मध्ये करण्यात आले. नागपूर ग्रामीण, प्राथमिक आरोग्य केंद्र-बेला (Primary Health Center), ग्रामीण रुग्णालय उमरेड, भिवापूर, कुही, नरखेड येथे करुन 5 हजार 8 दिव्यांग व्यक्तींची तपासणी व निदान केले. त्यापैकी 4 हजार दिव्यांग प्रमाणपत्र घरपोच देण्यात आले आहेत. जिल्ह्याच्या उर्वरित नऊ तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबन प्रणालीद्वारे ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र (Disability Certificate) देण्यासाठी लाभार्थ्यांची तपासणी व निदान करण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील दिव्यांग नागरिक, त्यांचे पालक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांना तसेच दिव्यांग कल्याणार्थ कार्यरत असलेल्या स्वयंसेवी संस्था आणि संघटनांनी सहकार्य करावे.
येथे होणार शिबीर
ऑनलाईन पध्दतीने दिव्यांगत्व प्रमाणपत्र वितरित करण्यासाठी तालुकानिहाय शिबीर 14 मार्चपासून सुरु झाले आहेत. 1 एप्रिलपर्यंत चालणाऱ्या विशेष मोहिमेत दिव्यांगत्व तपासणी व निदान शिबिराचे काम करण्यात येत आहे. नव्याने जिल्हृयाच्या ग्रामीण भागातील 5 हजार दिव्यांग व्यक्तींना दिव्यांगत्व प्रमाणपत्र घरपोच देण्याचा मानस आहे. ग्रामीण रुग्णालय निहाय शिबिराचे वेळापत्रक याप्रमाणे आहे. सोमवार, 21 मार्च काटोल, बुधवार, 23 मार्च सावनेर, गुरुवार, 24 मार्च रामटेक- कुटीर रुग्णालय व सोमवार, 28 मार्च ग्रामीण रुग्णालय रामटेक, बुधवार, 30 मार्च मौदा आणि शुक्रवार 1 एप्रिल पारशिवनी येथे होणार आहे.
येथे साधावा संपर्क
ज्या दिव्यांग व्यक्तीकडे जुने दिव्यांग प्रमाणपत्र आहेत किंवा दिव्यांग प्रमाणपत्र नाहीत, त्यांनी दिव्यांगत्व प्रमाणपत्राकरिता नजीकच्या नागरिक सुविधा केंद्रातील कॉमन सर्विस सेंअरमध्ये नोंदणी करावी. किंवा नजीकच्या सेतू केंद्रामध्ये जाऊन स्वावलंबन या पोर्टलवर प्राथमिक नोंदणी करून घ्यावी. या विषयी अधिक माहितीसाठी डीडीआरसीमधील सल्ला व मार्गदर्शन कक्षातील प्रवर्ग निहाय दिलेल्या 7755923211, 7387095077, 7756855077 व 7385753211 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.