सोयरीक एकाशी केली, संसार दुसऱ्याशी थाटला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला यांचा समाचार
२०१९ ला स्थापन झालेलं सरकार हे अनैतिक होतं. सोयरीक एकाशी केली. संसार दुसऱ्याशी थाटला.
नागपूर : अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला शिंदे-फडणवीस यांनी संवाद साधला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, विरोधी पक्षांची पत्रकार परिषद झाली. नागपूरमध्ये एक कार्यकर्ता म्हणून यायचो. नंतर मंत्री म्हणून आलो. आता मुख्यमंत्री म्हणून येण्याची संधी मिळाली. विदर्भ, नागपूर या भागाशी जिव्हाळ्याशी संबंध आला. हे अधिवेशन फार महत्तवाचं आहे. किती चालवावं यासाठी विरोधी पक्षानं काही आग्रह केला. त्याला उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिलं. विरोधी पक्षाच्या इच्छेप्रमाणे सर्व होईल.
कोविडचं कारण देऊन मागच्या सरकारनं विदर्भातील अधिवेशन टाळलं होतं. अजित पवार म्हणाले, हे खोके सरकार आहे. हे स्थगिती सरकार आहे. हे घटनाबाह्य सरकार आहे. मी सांगू इच्छितो, बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानानुसार, कायदेशीररीत्या बहुमताच्या आधारावर हे सरकार स्थापन झालेलं आहे. सभागृहात बहुमत सिद्ध करून हे सरकार स्थापन झालं आहे. असं मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितलं.
२०१९ ला स्थापन झालेलं सरकार हे अनैतिक होतं. सोयरीक एकाशी केली. संसार दुसऱ्याशी थाटला. हे सर्वांना माहीत आहे. हे खोके सरकार आहे, असं अजित पवार म्हणाले. पण, ही भाषा अजितदादा यांना शोभणारी नाही. खोक्यांचा जर एकावर एक ठिग लावला. तर, खूप उंच होईल. तिथपर्यंत नजर पोहचणार नाही. शिखर इतकं उंच होईल की, कडेलोट होईल.
आनंदाचा शिधा पोहचलं नसल्याचं भाष्य विरोधकांनी केलं. पण, माझ्याकडं आकडेवारी आहे. या सरकारनं सगळे सण, उत्सव जोरात साजरे झाले पाहिजे, यासाठी प्रयत्न केले. १०० रुपयांत रवा, साखर, तेल, डाळ देऊन सामान्यांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न केला. नुसत्या घोषणा दिल्या नाही. ९६ टक्के लोकांना शिधा पोहचला आहे, असंही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं.