Ganesh Tekdi temple | नागपुरातील गणेश टेकडी मंदिरात मुलं, ज्येष्ठांना प्रवेश बंद, कारण काय?
आज तिळी चतुर्थी आहे. टेकडी गणेश मंदिरात गर्दी होण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुलं, ज्येष्ठ नागरिक यांना या मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला आहे.
नागपूर : शहरातील टेकडी मंदिरात लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रवेश बंद करण्यात आलाय. नागपुरात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतलाय. शिवाय आज तिळी चतुर्थीला मंदिरात हार फुलं आणि पूजेचं साहित्य नेण्यावर निर्बंध आहे. आज तिळी चतुर्थी आहे. गणेशभक्तांसाठी अत्यंत महत्त्वाच्या या तिळी चतुर्थीला नागपूरच्या गणेश टेकडी मंदिरात मोठी गर्दी होते. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतलाय.
कोविड प्रोटोकॉलचे पालन
गणेश टेकडी मंदिरात प्रवेश घ्यायचा असेल तर मास्क अनिवार्य करण्यात आलंय. शिवाय सॅनिटायझरचा वापर केला जातोय. सामाजिक अंतराचे पालनही केले जाते. तरीही मुलं आणि ज्येष्ठ व्यक्तीनी दर्शनासाठी येऊ नये, असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय. अनाठायी गर्दी होऊ नये हे यामागचं कारण आहे. शिवाय भक्तांना दर्शनही घेता यावे.
खबरदारी म्हणून मंदिर प्रशासनाचा निर्णय
जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत सहा जणांना कोरोनामुळं मृ्त्यू झालाय. शिवाय चार हजारांच्या वर कोरोनाबाधित सापडल्यानं मंदिर प्रशासनाच्या वतीनं खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय. या पण, कोविड नियमांचं पालन करा असं आवाहन करण्यात आलंय.
भाविकांना मर्यादित प्रवेश
नागपूरचे आराध्य दैवत असलेल्या टेकडी गणरायाच्या चरणी नव्या संकल्पाचे अर्घ्य अर्पण करण्यासाठी भक्त माथा टेकतात. मकर संक्रांतीनंतर पौष महिन्यात येणारी पहिली चतुर्थी तिळी चतूर्थी म्हणून पाळली जाते. त्यात लाडक्या लंबोदराचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविकांनी पहाटेपासून गर्दी करतात. घरकाम आटोपल्यानंतर गृहिणी दुपारी बारानंतर टेकडी गणेशाच्या दर्शनासाठी धाव घेतात.