नागपूर : विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नागपूर जागेसाठी चुरशीची लढत आहे. भाजप वर्सेस काँग्रेस असा थेट सामना आहे. भाजपनं जोरदार तयारी केली आहे. त्यामानानं काँग्रेस प्रचारात थंडावल्याचं दिसतंय. यामुळं काँग्रेसचे कार्यकर्ते बाहेरून उमेदवार का आयात केला म्हणून संतप्त आहेत. तर उमेदवार आमच्यापर्यंत येत नसल्यानं मतदार संभ्रमात आहेत. आता नागपूरचा गड काँग्रेस कसा जिंकणार, असा प्रश्न निर्माण होतोय.
विधान परिषद निवडणुकीत बसपानं तटस्थ राहण्याचा निर्णय घेतलाय. भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे वर्सेस छोटू भोयर यांच्यात लढत होईल. बसपा तटस्थ राहणार असल्यानं काँग्रेसच्या अडचणी वाढणार आहेत. आमच्यासाठी काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही उमेदवार सारखेच असल्याचं बसपाचे प्रदेशाध्यक्ष अॅड. संदीप ताजणे यांनी सांगितलं.
नागपुरात आयात उमेदवारांमुळं काँग्रेस नेत्यांची फसगत झाली. काँग्रेसचे उमेदवार प्रचारातून गायब झाल्याचं चित्र आहे. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र भोयर प्रचारापासून दूर असल्याचं दिसतंय. रवींद्र भोयर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत राहून मोठे झालेत. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी त्यांनी काँग्रेसचा हात धरला. शेवटच्या क्षणी भोयर यांना उमेदवारी जाहीर करून मैदानात उतरवण्यात आले. काँग्रेसमधून काही जण लढण्यास इच्छुक होते. पण, काँग्रेसच्या नेत्यांचं आपआपसात जमत नसल्यानं एकमेकांवर कुरघोडी करण्यात आली. यातून बाहेरून उमेदवार आयात करावा लागला. निवडणुकीआधीच भोयर यांनी शस्त्र खाली टाकल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळं काँग्रेसची चांगलीच पंचायत झाली आहे. गेल्या आठवड्याभरात काँग्रेसच्या प्रचाराच्या कोणत्याही हालचाली दिसल्या नाहीत. स्वतः रवींद्र भोयर हेदेखील मतदारांशी संपर्क साधत नाहीत.
जिल्ह्यातले नेते विधान परिषद निवडणूक सोडून इतर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सक्रिय झालेत. काही नेते वेगवेगळ्या कारणानं जिल्ह्याच्या बाहेर कामामध्ये व्यस्त आहेत. या गोंधळामुळं सर्वसामान्य कार्यकर्ते संतप्त झाल्याचं पाहायला मिळते. तर मतदारांमध्ये संभ्रम पाहायला मिळतोय. उमेदवारानं प्रचाराची शस्त्र खाली टाकल्यानं काँग्रेस नेत्यांची गोची झाली आहे. आम्हाला भाजपसारखा घोडेबाजार करायचा नाही. आमच्यासाठी ही निवडणूक विचारधारेची आहे, असं काँग्रेसचे नेते सांगतात. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या भरोशावर ही निवडणूक काँग्रेस जिंकेल, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले करतात. भाजपचा उमेदवार घोडेबाजार करतोय, हे सर्वांना माहिती आहे. काँग्रेसनं पक्षाच्याच एखाद्या नेत्याला तिकीट का दिलं नाही. ऐनवेळी उमेदवार का आयात करावा लागला, असा प्रश्न पडतो. पण, काँग्रेसचे नेते हा प्रश्न फक्त नागपूर जिल्ह्यासाठीच नसल्याचं पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार म्हणतात.
ही निवडणूक जिंकणं काँग्रेससाठी महत्त्वाचं आहे. एखाद्या पक्षातील नेत्याला तिकीट दिलं असतं तरी ही निवडणूक काँग्रेसला जिंकता आली असती. ही निवडणूक जिंकून काँग्रेसला आपले नगरसेवक वाढविता आले असते. या माध्यमातून ते पालिकेच्या सत्तेच्या जवळ पोहचू शकले असते. आगामी नगरपंचायत निवडणुकीतही या निवडणुकीचा सकारात्मक परिणाम दिसू शकतो. पण, सध्याची परिस्थिती पाहता काँग्रेसची ही सगळी स्वप्न धुळीस मिळण्याची शक्यता आहे.