विजय वडेट्टीवारांची नागपूरच्या दीक्षाभूमीला भेट; भूमिगत पार्किंगच्या मुद्द्यावर म्हणाले, जनतेच्या भावनेचा…
Vijay Wadettiwar at Nagpur Deekshabhoomi : नागपुरातील दीक्षाभूमी परिसरातील भूमिगत पार्किंगचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. असं असतानाच काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दीक्षाभूमीला भेट दिली. यावेळी त्यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना भूमिगत पार्किंगच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली.
नागपुरातील दीक्षाभूमी परिसरातील भूमिगत पार्किंगचा मुद्दा तापला आहे. पार्किंगच्या बांधकामाची तोडफोड करण्यात आली आहे. नागपुरातील दीक्षाभूमी परिसरातील भूमिगत पार्किंगचा मुद्दा विधानसभेत उपस्थित झाला. लोकभावना पाहून नागपुरातील दीक्षाभूमी परिसरातील भूमिगत पार्किंगच्या कामाला स्थगिती देण्यात येत आहे. स्मारक समितीशी चर्चा केल्यानंतर या बाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येईल. त्यांच्याशी चर्चा करून मगच त्याचं पुढचं काम करण्यात येईल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात जाहीर केलं. या सगळ्या घडामोडींनंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नागपुरातील दीक्षाभूमीला भेट दिली.
विजय वडेट्टीवार यांची दीक्षाभूमीला भेट
राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दीक्षाभूमी परिसरात लोकांचा उद्रेकमुळे झालेल्या परिस्थितीची पाहणी केली. हा प्रकल्प कसा सुरू झाला? बाबासाहेब आंबेडकर याचा स्तूप इथे आहे. अस्थीकलश आहे. या गोष्टींना हानी पोहचणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. दीक्षाभूमी हे मोठं श्रद्धास्थान आहे. जनतेच्या भावनेचा विचार झाला पाहिजे होता, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
“…तर जनता कायदा हातात घेईल”
दीक्षाभूमीत लाखोच्या संख्यने लोक येतात. बाबासाहेबांच्या स्तूपाला धोका निर्माण झाल्यास त्याला जबाबदार कोण? हा पैसे कमावण्याचा धंदा आहे. समितीचा निर्णय मान्य नसेल. तर जनतेचा उद्रेक होईल, याचा विचार करून हे काम रद्द केले पाहिजे होतं.विरोधीपक्ष नेते म्हणून सभागृहात हा विषय उद्या मांडणार आहे. जागा समतोल करुन खड्डा बुजवला पाहिजे. खड्डा बुजवून सौंदर्यीकरण करावं. 15 दिवसात काम झाले नाही. तर जनता स्वत: येऊन खड्डा बुजवेल. जनता कायदा हातात घेईल, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
कुठलंही काम होत असताना जनतेच्या भावनेचा विचार करून निर्णय घ्यावा लागतो. पण तसे इथे झालं नाही. लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. दीक्षाभूमीवर आलेलं लोक थांबणार कुठे हा प्रश्न आहे. पूर्ण दिक्षाभूमीवरील ग्राऊंड खराब झालं आहे. खरा बाप कोण तर बाबासाहेब आबेडकर असं त्यांचे अनुयायी म्हणतात. ही लोकांची भावना आहे. त्याचा विचार होत नसेल तर चुकीचे आहे. जनतेने कायदा हातात घेतला तर काय करायचं हे जनता ठरवेल, असंही विजय वडेट्टीवार म्हणाले.