नागपूर : राज्यातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीतील मित्र पक्षामधूनही चर्चेला उधान आले. तर दुसरीकडे शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष कोण असा सवाल उपस्थित केला जात आहे. तर महाविकास आघाडीतीलच काँग्रेस आणि ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि नाना पटोले यांचे वाकयुद्धही चालू असलेले दिसून येत आहे. त्यामुळे आता काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खडे बोल सुनावले आहेत. त्यामुळे काँग्रेसमध्ये नेमके चाललय काय असा सवाल आता कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांकडून उपस्थित केले जात आहेत.
काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना नाना पटोले यांनी सांगितले की, आगामी काळातील निवडणुका कधी लागतील तेव्हा लागतील मात्र काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आतापासून तयार राहिले पाहिजे अशा सुचनाही त्यांनी दिल्या आहेत.
यावेळी आमदार नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांना सूचना करताना सांगितले की, काँग्रेसमधील अंतर्गत कलह आता खपवून घेतले जाणार नाहीत.
जाहिरित्या अंतर्गत कलह दिसून येतील, आपल्या पक्षात कुरघोड्या कोणी करत असतील तर त्यांच्यावरही कडक कारवाई केली जाणार असा इशाराही त्यांनी दिला आहे.
नाना पटोले यांनी म्हटले आहे की, गुजरातमधून भेसळ खत येत आहे आणि त्याचेही भाव प्रचंड वाढले आहेत पण त्यावरसुद्धा आता त्यांचाच फोटो दिसतो आहे असं म्हणत त्यांनी नरेंद्र मोदी आणि भाजपला जोरदार टोला त्यांनी लगावला आहे.
काही दिवसापूर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यामध्ये अनेक भागात काँग्रेसने बाजी मारली आहे.
त्यामुळे त्याविषयी बोलताना नाना पटोले यांनी सांगितले की, बाजार समितीमध्ये काँग्रेस एक नंबरवर आहे. त्यामुळे आता आगामी काळातील निवडणुकांमध्येही जर नंबरवन आपला शिक्का मोर्तब करायचा असेल तर त्यासाठी आतापासूनच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तयारीला लागायला पाहिजे अशा सूचना नाना पटोले यांनी दिल्या आहेत.
बाजार समित्यांच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. त्यामुळे लोकांचा कल आता काँग्रेसकडे वाढला आहे भाजपकडे पैसा आहे आमच्याकडे पैसे नाही मात्र जनता आपल्या सोबत असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. पक्षा पेक्षा कोणी मोठं नाही,
पक्षात एकमेकांना पाडण्याचे धंदे कोणी केले तर मी त्यांना सोडणार नाही असा इशारा देत गट-तट आता चालणार नाही, तसेच पक्षाच्या मिटिंगला प्रत्येकाने आलेच पाहिजे व जो येणार नाही त्याचा रिपोर्ट मला द्या मी कारवाई ही करणारच असा इशाराही त्यांनी दिला आहे.