मोठी बातमी ! काँग्रेसकडून लोकसभेच्या सर्वच जागांची चाचपणी, कारण काय?; तर्कवितर्कांना उधाण
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रभारी एच.के. पाटील यांचा कर्नाटक मंत्रिमंडळात समावेश करण्यात आल्यामुळे ती जबाबदारी नव्या नेत्याकडे सोपविली जाणार आहे. या पदासाठीही चाचपणी सुरू आहे.
नागपूर : लोकसभा निवडणुकीला अवघे काही महिने बाकी आहेत. त्यामुळे या निवडणुकीची सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. बैठका, मिटिंगा आणि आढावा यावर सर्वच राजकीय पक्षङांनी भर दिला आहे. महाविकास आघाडीने तर वज्रमूठ सभा घेऊन धुराळाच उडवून दिला आहे. लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपा संदर्भात महाविकास आघाडीची बैठकही झाली आहे. आघाडीतील तिन्ही पक्षाचे प्रत्येकी दोन दोन नेते जागा वाटपाबाबत सखोल चर्चा करणार आहेत. असं असतानाच एक वेगळी बातमी येऊन धडकली आहे. काँग्रेस राज्यातील लोकसभेच्या सर्वच्या सर्व म्हणजे 48 जागांची चाचपणी करणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत नेमकं चाललंय काय? असा सवाल केला जात आहे.
राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघात काँग्रेसची चाचपणी होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेसची 2 आणि 3 जून रोजी मुंबईत बैठक होणार आहे. सर्व लोकसभा मतदारसंघात उमेदवारांच्या चाचपणीसाठी काँग्रेसची ही बैठक होत आहे. राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाकडे असलेल्या मतदारसंघातंही काँग्रेसची चाचपणी होणार आहे. या चाचपणीच्या आधारेच काँग्रेस महाविकास आघाडीत जागा मागणार असल्याचं सांगितलं जात आहे.
आमदार, जिल्हाध्यक्ष उपस्थित राहणार
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या चाचपणीसाठी काँग्रेसची ही बैठक होत आहे. लोकसभा मतदारसंघातील जिल्हाध्यक्ष, आमदार, प्रमुख नेत्यांना या बैठकीसाठी आमंत्रण देण्यात आलं आहे. या नेत्यांकडून आढावा घेतला जाणार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
रिपोर्ट तयार करणार
या बैठकीत प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे. काँग्रेसची कोणत्या मतदारसंघात किती ताकद आहे याची चाचपणी केली जाणार आहे. तसेच किती मतदारसंघात काँग्रेसचे किती प्रबळ उमेदवार आहेत याचीही माहिती घेतली जाणार आहे. त्याचा एक विस्तृत रिपोर्ट तयार केला जाणार असून या रिपोर्टनुसारच काँग्रेस जागांची मागणी करणार असल्याचंही सांगितलं जात आहे.
पक्षांतर्गत फेरबदल होणार
दरम्यान लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी राज्यातील काँग्रेस पक्षात दिल्लीस्तरावर हालचाली सुरू आहेत. काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होणार असल्याची माहिती मिळत आहे. दोन दिवसांपूर्वी राज्यातील काही नेत्यांनी दिल्लीत जाऊन वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्याने हालचाली वाढल्या आहेत. प्रदेश काँग्रेसच्या सध्याच्या रचनेत काही महत्त्वपूर्ण फेरबदल करून प्रमुख नेत्यांवर पक्षाच्या नव्या जबाबदाऱ्या दिल्या जाण्याची दाट शक्यता.
आज दिल्लीत बैठक
राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर अंतर्गत कलहावर पक्ष श्रेष्टी नाराज असल्याची माहिती आहे. पक्षात वरिष्ठ नेत्यांमध्येच एकोपा नाही, अशी राज्यातील नेत्यांची राहुल गांधी आणि कााँग्रेस अध्यक्षांकडे तक्रार आहे. याबाबत आज दिल्लीत प्रमुख नेत्यांमध्ये बैठक होणार असल्याची माहिती आहे.