नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा 109 वा दीक्षांत समारंभ आज पार पडला. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत (Uday Samant) उपस्थित होते. या देशात पूर्वी जसे आपल्या नालंदा विश्वविद्यालयात शिक्षण घ्यायला येत होते. त्याचप्रकारे आपल्या देशात शिक्षण घ्यायला यायला पाहिजे, असं मत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी (Governor Koshyari) व्हिडीओ संदेशद्वारे विद्यार्थ्यांना संबोधित करीत असताना केले. चारही विद्याशाखामंधील एकूण 531 विद्यार्थांना आचार्य (Acharya) पदवी बहाल करण्यात आली. तसेच याचवेळी, 2020 च्या हिवाळी व 2021 च्या हिवाळी व 2021 च्या उन्हाळी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या 77 हजार 378 विद्यार्थ्यांना स्नातक व स्नातकोत्तर पदव्या प्रदान करण्यात आल्या.
यावेळी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितलं की, विद्यापीठ गीताची गरज महाराष्ट्राला आहे. नागपूर विद्यापीठाचं गीत हे मजबूत आहे. धर्मात वाद लावू नये. जातीत वाद लावू नये असं वर्णन या गीतात आहे. इथं सगळे डॉक्टर आहेत. त्यामुळे मी तुम्हाला मार्गदर्शन करण्याइतपत मोठा नाही, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. विद्यापीठ गीतात लिहिलं आहे. नेहमी खरं बोलावं हे नेमकं विद्यार्थ्यांसाठी होत की राजकारण्यांकरिता हे मला कळलं नाही, अशी कोपरखेडीसुद्धा त्यांनी मारली.
उदय सामंत म्हणाले, राज्यपाल आणि माझे निकटचे संबंध आहेत. म्हणून त्यांच्या आदेशानुसार मी इथे आलो आहे. पदवी समारंभात आजसुद्धा आम्ही इंग्रजांनी दिलेले मोठं मोठे गाऊन घालतो. न्यू एज्युकेशन पॉलिसीची अंमलबजावणी करणार आहोत. एका सिनेमातून एक स्टाईल आली. मी झुकणार नाही. ती आता राजकारणात सुद्धा आली. मात्र, आमच्या शिवाजी महाराजांनी इंग्रजांना तेव्हाचं सांगितलं होतं मी झुकणार नाही. ज्यांनी स्वातंत्र्यासाठी खस्ता खाल्या त्यांच्यात सुद्धा आता गट तट निर्माण केले जातात. याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला. ऑनलाईन की ऑफलाईन. आम्ही आता ऑफलाईन परीक्षा घेणार आहोत. या ठिकाणी विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षा असं उत्तर दिलं.