नागपूर : जिल्ह्यात ओमिक्रॉनने बाधित सहा रुग्णांची नोंद झाली होती. त्यात सोमवारी, तीन जानेवारीला आणखी चार रुग्णांची भर पडली. त्यामुळं धोका आणखीनंच वाढला आहे. ओमिक्रॉनबाधितांची संख्या आता दहावर पोहोचली आहे.
नव्या ओमिक्रॉन बाधितांमध्ये एका सहा वर्षीय चिमुकल्याचाही समावेश आहे. दोघे तरुण हे दुबई रिटर्न आहेत. एक बाधित महिला ही लंडनवरून परतली आहे. ओमिक्रॉनसोबतच कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळं प्रशासनही चिंतेत आले आहे. नागरिकांनीही आता कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याची नितांत गरज आहे.
20 डिसेंबर 2021 रोजी युगांडातून परतलेल्या मायलेकाची नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर चाचणी करण्यात आली होती. त्यात महिलेसह तिच्या सहा वर्षीय मुलाचा अहवाल कोरोना सकारात्मक आला. त्यांचे नागपुरात घर असल्यानं त्यांचा अहवाल सकारात्मक येताच मनपाचे पथक त्यांच्या घरी गेले. पण, तोवर ते अमरावती येथे निघून गेले होते. त्यांचा अहवाल सकारात्मक आल्याचे सांगितल्यानंतर ते अमरावतीतील रुग्णालयात भरती झाले. त्यांचा एक नमुना ओमिक्रॉनच्या जिनोम सिक्वेन्सिंगकरिता पुण्याच्या प्रयोगशाळेकडे पाठविला होता. त्यापैकी सहा वर्षीय मुलाचा सोमवारी, तीन जानेवारीला अहवाल ओमिक्रॉन सकारात्मक आला. त्याच्या मातेचा अहवाल प्रतीक्षेत आहे.
तसेच 26 डिसेंबर रोजी दुबई येथून परत आलेल्या दोन तरुणांनाही कोरोनाच्या नवा व्हेरियंट असलेल्या ओमिक्रॉनची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील नागभिडमधील 36 वर्षीय तरुण व गोंदिया जिल्ह्यातील तिरोड्यातील 28 वर्षीय तरुणाचा समावेश आहे. हे दोघेही कामानिमित्ताने दुबईला गेले होते. दुबईतील शारजा येथून थेट विमानाने ते 26 डिसेंबरला नागपूर विमानतळावर पोहोचले. त्यांची विमानतळावर कोविड चाचणी केली होती. त्यात हे दोघेही सकारात्मक आढळून आलेत. दरम्यान, ओमिक्रॉनचा धोका लक्षात घेता त्यांचा एक नमुना (स्वॅब) जिनोम सिक्वेन्सिंगकरिता पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आला. त्याचा अहवाल सोमवारी प्राप्त झाला. या दोघांनाही ओमिक्रॉनची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या त्यांच्यावर शहरातील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत.