नागपूर |24 सप्टेंबर 2023 : राज्यात सध्या विविध भागात मुसळधार पाऊस पडतोय. राज्याच्या काही भागात सरासरीच्या अधिक पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणीच पाणी पाहायला मिळतंय. नागपूरमध्येही धो-धो पाऊस कोसळतोत. त्यामुळे काल नागपूर शहरात पाणीच पाणी पाहायला मिळालं. दुकानं-घरांमध्ये पाणी शिरलं. यामुळे नागपूरकरांचं मोठं नुकसान झालं आहे. घरात पाणी शिरल्याने रोजच्या वापराच्या वस्तूंचं, तसंच अन्नधान्यांचंही मोठं नुकसान झालंय. या पावसाच्या पाण्यात खानपानाच्या वस्तू वाहून गेल्या आहेत. त्यामुळे नागपूरकर चिंतेत आहेत. अशात ज्या भागात पावसामुळे नुकसान झालं त्या भागात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी करत आहेत.
अतिमुसळधार पावसामुळे लोकांचं नुकसान झालं आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पूरग्रस्त भागात पाहणी करत आहेत. स्थानिकांशी संवाद साधत देवेंद्र फडणवीस परिस्थितीचा आढावा घेत आहेत.
नागपूरमध्ये अवघ्या 4 तासात 100 मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला. या मुसळधार पावसामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला. त्यामुळे नागपूरच्या काही भागात पाणी साचल्याचं चित्र होतं. नागपूरमधील समता नगर परिसरात काल 10-12 फुटांपर्यंत पाणी साचलं होतं. आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर यायला लागली आहे. पूर ओसरायला लागला आहे. यातून नागरिक सावरत असतानाच आता आजही हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे सतर्क राहण्याच्या सूचनाही हवामान खात्याकडून देण्यात आल्या आहेत.
मुसळधार पावसामुळे नागपूरकरांचं मोठं नुकसान झालंय. यासाठी सरकारकडून उपाययोजना करण्यात आल्या आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर महानगरपालिकेत बैठक घेतली. यात त्यांनी सरकारकडून करण्यात येणाऱ्या मदतीची घोषणा केली. नागपूरमधील पूरग्र्रस्तांना प्रत्येकी 10 हजार रुपये तातडीची मदत देण्यात येणार आहे. ज्यांच्या दुकानांचं नुकसान झालंय त्यांना 50 हजार रूपयांची मदत देण्यात येणार आहे. तर टपरीधारकांना 10 हजारापर्यंत मदत देण्यात येणार आहे. पुरामुळे काही भागात गाळ साचला आहे. हा गाळ काढण्यासाठी राज्य सरकारकडून निधी जाहीर करण्यात आला आहे, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.