धक्कादायक! फुलपाखरांच्या संख्येत घट, अन्नसाखळी येणार धोक्यात?
गेल्या काही वर्षांत फुलपाखरांची संख्या रोडावली आहे. गेल्या तीस वर्षात फुलपाखरांच्या संख्येत 40 टक्के घट झाल्याचा पर्यावरण अभ्यासकांचा निष्कर्ष आहे. फुलपाखरं समृद्ध पर्यावरणाची शान असतात. त्यांची घटती संख्या चिंताजनक आहे.
अकोला : फुलपाखर परागीकरण करत असल्यानं अन्नसाखळीत त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. पण, गेल्या काही दिवसांत फुलपाखरांच्या संख्येत घट झाली आहे. त्यामुळं अन्नसाखळी धोक्यात तर येणार नाही ना? अशी भीती आता पर्यावरण अभ्यासकांना सतावू लागली आहे.
गेल्या काही वर्षांत फुलपाखरांची संख्या रोडावली आहे. गेल्या तीस वर्षात फुलपाखरांच्या संख्येत 40 टक्के घट झाल्याचा पर्यावरण अभ्यासकांचा निष्कर्ष आहे. फुलपाखरं समृद्ध पर्यावरणाची शान असतात. त्यांची घटती संख्या चिंताजनक आहे. अकोला शहराच्या विविध भागांत या वर्षी मृतावस्थेत आढळलेल्या फुलपाखरांची संख्या अधिक असल्याचीही नोंदी आहेत. त्यामुळं येणाऱ्या काळात फुलपाखरू संवर्धनाकरिता अधिक जोमाने कार्य करू असे मत क्लबच्या निसर्ग अभ्यासकांनी केले आहे. अकोल्यात ब्लू मॉरमॉन नेचर क्लबचा अभ्यासानुसार 29 प्रकारच्या फुलपाखरांची नोंद आहे.
ताण कमी करण्याचे साधन फुलपाखरू
फुलपाखरू म्हटलं तर आपल्या नजरेसमोर येते विविध आकार, विविध रंगांची, सर्वांना आकर्षित करणारी निसर्गाची सर्वात सुंदर रचना. त्यामुळं लहानांपासून तर वृद्धापर्यंत सर्वांनाच फुलपाखर आवडतात. फार पूर्वीपासूनच फुलपाखरं आपल्या आजूबाजूला वावरत आलेली आहेत. आपल्याला उपलब्ध होत असलेल्या अन्नसाठ्यापैकी 30 टक्के अन्नसाठा फुलपाखरांच्या परागीभवनाचे प्रक्रियेतून मिळत असतो. अन्नसाखळीतही फुलपाखरं फार महत्त्वाची भूमिका बजावीत असतात. त्याचबरोबर फुलपाखरांच्या निरीक्षणाकरिता दरवर्षी हजारो विदेशी पर्यटक आपल्या देशाला भेटी देत असतात. फुलपाखरू निरीक्षण ताण घालविण्याचे एक उत्तम साधन आहे.
29 प्रकारच्या फुलपाखरांच्या नोंदी
वाढते प्रदूषण, तणनाशक, कीटकनाशकांचा वाढता वापर यामुळं फुलपाखरांची संख्या धोक्यात येत आहे. विदेशी फुलझाडांचे वाढते प्रस्थ, हवामान बदलाच्या गडद संकटामुळे फुलपाखरांच्या कितीतरी प्रजाती शहरातून हद्दपार होत आहेत. अशी माहिती ब्लू मॉरमॉन नेचर क्लबचे संस्थापक अध्यक्ष हरीश शर्मा यांनी दिली. शहरातील पार्क, खुली मैदाने, उद्याने, रस्त्याकडील विविध भागात केलेल्या अभ्यास दौऱ्यात या वर्षी शहरात 29 प्रकारच्या फुलपाखरांच्या नोंदी झाल्याची माहिती त्यांनी दिली.
फुलपाखरांच्या प्रजातींचा केला उलगडा
ऑगस्ट ते नोव्हेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत क्लबच्या सदस्यांनी फुलपाखरांच्या विविध प्रजातींचा शोध घेतला. यामध्ये जोकर, कॉमन ग्रास येलो, कॉमन जेझबेल, कॉमन जे, टैलड जे, लाइम बटरफ्लाय, कॉमन गल, व्हाईट पायोनियर, कॉमन एविनिंगब्राउन, ग्रे पैन्सी, प्लैन टाइगर, पी ब्लू, कॉमन इंडियन क्रो, ग्रेट इगफ्लाय, कॉमन कास्टर, कॉमन बैंडेड आउल, कॉमन रोझ, कॉमन मॉरमॉन, कॉमन इमिग्रंट, ऑरेंज टीप, रेड टीप, येलो टिप, लेमन पैन्सी, कॉमन बुशब्राउन, कॉमन लेपर्ड, टॉवनी कॉस्टर, स्ट्रिपड टाइगर, ग्राम ब्लू, स्टेट फ्लॅश अशा 29 प्रकारच्या फुलपाखरांच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.