Devendra Fadnavis : नागपूरलगतच्या भागात विकास करणार, थांबलेल्या प्रकल्पांना गती देणार, देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन
देवेंद्र फडणवीस म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी हर घर तिरंगा कार्यक्रम दिला. नागपूरकरांनी तो कार्यक्रम उचलून धरला. येत्या काळात राष्ट्रभक्तीची भावना कायम ठेवणार आहोत.
नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपुरात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी फडणवीस म्हणाले, स्वातंत्र्य दिवसाचा (Independence Day) सगळ्यांना शुभेच्छा देतो. आपल्याला बलशाली भारत (Strong India) तयार करायचा आहे. नवीन आलेलं सरकार समाजातील लोकांना घेवून विकसित महाराष्ट्र (Maharashtra) तयार करेल. पुढच्या 25 वर्षांचा विकास डोळ्यांसमोर ठेऊन काम करायचं आहे. शेवटच्या माणसाच्या घरी पिण्याचं पाणी, वीज, घर देतोय. विकासाच्या कामात सर्वांचा समावेश करुन घेऊ. नागपूर लगच्या भागात विकास करणार आहोत. नागपूरचे जे प्रकल्प थांबले, त्याला गती देणार, असल्याचं आश्वासन फडणवीस यांनी यावेळी दिलं.
पुढील 25 वर्षांचा भारत घडवण्याचा विचार
देवेंद्र फडणवीस म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी हर घर तिरंगा कार्यक्रम दिला. नागपूरकरांनी तो कार्यक्रम उचलून धरला. येत्या काळात राष्ट्रभक्तीची भावना कायम ठेवणार आहोत. पुढच्या काळात जाती धर्माच्या नावावर विभाजन होऊन देणार नाही, अशी प्रत्येकाची भावना आहे. सर्व स्तरातील लोकांच्या विकासासाठी प्रयत्न करायचा आहे. पुढील 25 वर्षांचा भारत घडवण्याचा विचार करायचं आहे. महाराष्ट्रात नविन सरकार आलंय, हे सरकार सर्वांना सोबत घेऊन विकास करणार आहोत. स्वातंत्र्य लढ्यात नागपूरचं मोठं योगदान आहे. स्वातंत्र्य सैनीकांप्रती नतमस्तक होण्याचा आजचा दिवस आहे. गेल्या काही दिवसांत नागपूरचा झपाट्याने विकास होतोय. झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना पक्की घरं देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं.
विदर्भातील उद्योगांना अनुदान देऊ
फडणवीस म्हणाले, आज शेतकऱ्यांवर मोठं संकट आलंय. मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला आणि शेतकऱ्यांना मोठी मदत जाहीर केली. जनावरांचं नुकसान, घरांची पडझड यांची आणखी मदत देणार आहोत. येत्या काळात महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी काम करायचं आहे. विदर्भ मागास राहिला, त्याच्या विकासासाठी सिंचन प्रकल्प, उद्योग यासाठी काम करायचं आहे. उद्योगांना वीज अनुदान देऊन नवीन उद्योग विदर्भात आणणार, रोजगार निर्मित होईल. गेल्या सरकारने विदर्भातील उद्योगाची वीज सबसीडी काढल्याने रोजगार गेले, ती आम्ही परत देऊ, असं आश्वासनही फडणवीस यांनी दिलं.