दीक्षाभूमी विकासाच्या इतक्या कोटींच्या आराखड्याला मंजुरी, देवेंद्र फडणवीसांनी काय सांगितलं
देश-विदेशातून लाखो अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी दीक्षाभूमीवर येतात.
सुनील ढगे, TV9 मराठी, प्रतिनिधी, नागपूर : 190 कोटींच्या दीक्षाभूमी विकासाच्या सुधारित आराखड्याला पुढील 15 दिवसात मान्यता देण्यात येईल. अशी महत्त्वपूर्ण घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केली. 66 व्या धम्मचक्र प्रवर्तन वर्धापन दिन सोहळ्यात लक्षावधी अनुयायांसमोर ते बोलत होते. ऐतिहासिक दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या विद्यमाने तसेच जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने धम्मचक्र प्रवर्तन वर्धापन दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. कमलाताई रा. गवई होत्या.
केंद्रीय महामार्ग व दळणवळण मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस आयुक्त अमितेशकुमार, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी. उपस्थिती होती. भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई हे प्रकृती अस्वास्थामुळे कार्यक्रमाला उपस्थित नव्हते.
ऐतिहासिक दीक्षाभूमीवर 66 वर्षांपूर्वी 14 ऑक्टोबर 1956 रोजी दसरा सणाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मदीक्षा घेतली. त्यानंतर त्यांनी लाखो अनुयायांना दीक्षा दिली. तेव्हापासून दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन वर्धापन दिन सोहळा नागपूर येथे होतो.
देश-विदेशातून लाखो अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी दीक्षाभूमीवर येतात. यावर्षीही गेल्या तीन दिवसात जवळपास 30 लाख नागरिकांनी याठिकाणी अभिवादन केले. पाऊस सुरू असतानाही अनुयायांनी केलेली गर्दी लक्षणीय होती.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते महापौर असतानापासून दीक्षाभूमीच्या विकासासाठी केलेल्या कार्याची माहिती दिली. तसेच केंद्र सरकारकडून दीक्षाभूमीला ‘अ’ दर्जाच्या धार्मिक स्थळाची मान्यता प्रलंबित आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व रामदास आठवले यांच्यासह आपण स्वतः पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दीक्षाभूमीच्या विकासासाठी यापूर्वी शंभर कोटी रुपयांचा आराखडा मंजूर केला होता. त्यापैकी 40 कोटी रुपये नागपूर सुधार प्रन्यासकडे जमा आहेत. 60 कोटी रुपये देण्याची राज्य शासनाची तयारी होती. परंतु, गेल्या काही दिवसांमध्ये पाठपुराव्या अभावी दीक्षाभूमी आराखडा रखडला होता.