मराठा समाज आक्रमक होण्याचे कारण काय, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं
लोकायुक्त विधेयक कोण्या व्यक्तीला नजरेसमोर ठेवून आणलेलं नाही. लोकायुक्त विधेयकात ते येत असतील तर आम्हीदेखील येतोय.
नागपूर : दोन्ही पक्ष आपलं अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न करत आहेत. नॅनो मोर्चा निघाल्यानं ते आत्मचिंतन करत असल्याचं मला वाटतं. आपलं अस्तित्व मीडियाच्या माध्यमातून गेलं पाहिजे, असा त्यांचा प्रयत्न आहे. अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मी नॅनो मोर्चा म्हटला त्याचा शिक्कामोर्तबचं झाला आहे. मराठा मोर्चाचा व्हिडीओ दाखवून तो संजय राऊत यांनी ट्वीट केला. त्यातून हे लक्षात येत की, त्यांचा मोर्चा नॅनो होता. त्यामुळं थोडा मानसिक परिणाम झालेला आहे. म्हणून अशाप्रकारे हे सर्व चाललेलं आहे, असंही फडणवीस म्हणाले.
तो मराठा मोर्चा होता. त्यावेळी हीच मंडळी होती. मूक मोर्चाला मुका मोर्चा म्हणून मत व्यक्त केलं होतं. पेपरमध्येही छापलं. आता तेच लोकं त्याचा व्हिडीओ ट्वीट करतात. नंतर मुजोरी करतात की, महाविकास आघाडीनं तो मोर्चा काढला होता. आम्ही त्यामध्ये होतो. त्यामुळं मराठा समाज हे सहन करणार नाही. असा कोणीही त्याचा राजकीय उपयोग करू नये, असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी केला.
लोकायुक्त विधेयक कोण्या व्यक्तीला नजरेसमोर ठेवून आणलेलं नाही. लोकायुक्त विधेयकात ते येत असतील तर आम्हीदेखील येतोय. पहिल्यांदा मुख्यमंत्री यांनादेखील त्यामध्ये आणले आहे. केंद्राच्या धर्तीवर अण्णा हजारे यांनी सुचविल्यानुसार कमिटीनं ठरविलं. अण्णा हजारे यांनी सुचविलेल्या सूचना तंतोतंत मान्य केल्या आहेत. त्यामुळं कुणालाही नजरेसमोर ठेवून तो केलेला नाही, असं फडणवीस यांनी सांगितलं.
आमचा कुणाशी सामना नाही. आम्ही सामना वाचत नाही. त्यामुळं आम्हाला सामनाबद्दल माहीत नाही. ईडी आणि सीबीआयचा दुरुपयोग त्यांच्या काळात झाला आहे. सीबीआयच्या माध्यमातून ते कसं काम करत होते. ते सर्वांना माहीत आहे. मोदी यांच्या सरकारमध्ये ईडी, सीबीआयचा दुरुपयोग झालेला नाही, असं फडणवीस म्हणाले.