Dilip Walse-Patil : महागाईवरून लक्ष हटवण्यासाठी अशांतता निर्मिती सुरू; वळसे-पाटलांचा भाजपवर थेट आरोप, दंग्याची पाळेमुळे खणणार
देशासमोर महागाई (Inflation), बेरोजगारी, सीमा सुरक्षा असे गंभीर प्रश्न आहेत. केंद्र सरकारने आणि भाजपने (BJP) त्यावर जास्त लक्ष द्यावे. मात्र, या सगळ्या गोष्टींवरून अन्यत्र लक्ष वळण्यासाठी अशांतता निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत, असा आरोप गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना भाजपवर केला.
नागपूरः देशासमोर महागाई (Inflation), बेरोजगारी, सीमा सुरक्षा असे गंभीर प्रश्न आहेत. केंद्र सरकारने आणि भाजपने (BJP) त्यावर जास्त लक्ष द्यावे. मात्र, या सगळ्या गोष्टींवरून अन्यत्र लक्ष वळण्यासाठी अशांतता निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. याबाबत ‘आयबी’ आणि ‘रॉ’बरोबर बोलून फिल्ड इनपूट घेणार आहोत. दंग्यामागे कोणता कट आहे, हे तपासून धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करणार आहोत, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse-Patil) यांनी दिली. ते नागपूरमध्ये आले असता बोलत होते. वळसे-पाटील म्हणाले की, राज्याच्या पोलीस महासंचालकांना सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार शहरातील सीपींनी बैठका घेतल्या आहेत. आता 3 तारखे नंतर कायदा आणि सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे वाटत नाही, अशी शक्यताही त्यांनी वर्तवली. महाराष्ट्रात आणि देशात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे मात्र, आम्ही त्याची काळजी घेत आहोत, असे त्यांनी आवर्जून सांगितले.
दंग्याचे इनपुट नाही…
दिलीप-वळसे पाटील म्हणाले की, सध्या तरी दंग्या संदर्भात काही इनपुट नाही. अमरावतीमध्ये घटना घडली याचा, अर्थ तिथे काही घटक अॅक्टिव्ह आहेत. त्याचा बंदोबस्त आवश्यक आहे. राज ठाकरे यांनी भूमिका घेतल्यामुळे पावले उचलावे लागली असे नाही. मात्र, कोणते घटक अशांतता निर्माण करत आहेत, ते पोलीस तपासात पुढे येईल. सगळ्या घटनांवर पोलीस लक्ष ठेऊन असल्याचेही त्यांनी सांगितले.
सर्व पक्ष, धार्मिक संघटनांशी बोलावे…
दिलीप वळसे-पाटील म्हणाले की, काही घटकांना केंद्राकडून सुरक्षा पुरविली जाते. मात्र, त्यांच्याकडून राज्याच्या अधिकारावर अतिक्रमण केले जाते, असा उल्लेखही त्यांनी केला. राज यांना मुंबई पोलिसांकडून जास्त सुरक्षा पुरवण्याचा निर्णय कमिटी घेणार असल्याचे ते म्हणाले. सगळ्या पक्षांना एकत्रित बसवून त्यांच्याशी आणि धार्मिक संघटनांशी बोलावे, असे मला वैयक्तिक वाटते. मी माझ्या पद्धतीने जिथे अॅक्शन घ्यायला पाहिजे तिथे घेत असतो. राजकीय कोण, काय बोलत हे महत्त्वाचे नाही. आमच्या पक्षात प्रत्येक मंत्री आणि पदाधिकारी यांना जबाबदारी दिली जाते. माझ्याकडे नागपूर , गडचिरोली आहे. त्यानुसार पक्ष बळकटी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
इतर बातम्याः