Nagpur : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नागपुरात निर्धुर चुलींचे वाटप, महात्मा फुले विकास महामंडळाचा उपक्रम
महागाईच्या काळात गॅस सिलेंडर घेणे फार जिकरीचे झाले आहे. त्याऐवजी निर्धुर चुलीचा वापर केल्यास पैशाची बचत होते. चुलीमुळे धुर होत नसल्याने महिलांच्या आरोग्यास हानी होत नाही.
नागपूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त (Amrit Mahotsav of Independence) महात्मा फुले विकास महामंडळाच्या वतीने सुधारित निर्धुर चूल वाटपाचा उपक्रम जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे आयोजित करण्यात आला. अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना सुधारित निर्धुर चुलीचे वाटप जिल्हाधिकारी आर. विमला यांच्या हस्ते करण्यात आले. समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिध्दार्थ गायकवाड (Regional Deputy Commissioner Dr. Siddharth Gaikwad), अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मोहित गेडाम, एन-किल इंटरनॅशनलचे श्री. गोयल, महात्मा फुले विकास महामंडळाचे (Mahatma Phule Development Corporation) व्यवस्थापक श्री. देवतळे यावेळी उपस्थित होते.
गॅस सिलेंडर नसलेल्यांना मिळणार निर्धुर चूल
महागाईच्या काळात गॅस सिलेंडर घेणे फार जिकरीचे झाले आहे. त्याऐवजी निर्धुर चुलीचा वापर केल्यास पैशाची बचत होते. चुलीमुळे धुर होत नसल्याने महिलांच्या आरोग्यास हानी होत नाही. यामुळे या चुलीचा लाभ अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आर. विमला यांनी केले. ज्यांच्याकडे गॅस सिलेंडर नाही अशाच लाभार्थ्यांना ही चुल मिळणार आहे. यासाठी जातीचा दाखला, आधारकार्ड व रेशन कार्डच्या साक्षांकित प्रती व छायाचित्र अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
महाप्रीत कंपनीतर्फे वाटप
महात्मा फुले विकास महामंडळाचे संचालक विपीन श्रीमाळी यांच्या मार्गदर्शनात महाप्रीत कंपनीतर्फे या चुलीचे वाटप करण्यात आले. थर्मल पावरचा वापर करुन ही चुल तयार करण्यात आली. पालापाचोळा व सरपन व काड्यांवर ही चुल पेटते. त्यामुळे धुर होत नाही. यावेळी पन्नास अनुसूचित प्रवर्गातील लाभार्थ्यांना निर्धुर चुलीचे वाटप करण्यात आले. त्यासोबत अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महात्मा फुले विकास महामंडळाचे व्यवस्थापक यांनी केले. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.