Nagpur : शहिदांच्या वीर पत्नींना उद्योग व्यवसायात जिल्हा प्रशासनाची मदत, नागपुरात 23 व्या कारगिल दिनाला शहिदांना अभिवादन
रामटेक तालुक्यातील चिचाळा येथील निलेश धरम दमाहे या जखमी जवानाला वीस लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. हा जवान सध्या डेहराडून येथे कार्यरत आहे.
नागपूर : शहिदांच्या वीर पत्नींना वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रशिक्षण व उद्योग व्यवसाय करण्याची आवश्यकता आहे. त्यांना हवी ती मदत करायला जिल्हा प्रशासन तत्पर असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी (Collector) आर. विमला यांनी येथे केले. 23 व्या कारगिल विजय दिवसाच्या पर्वावर शहिदांना अभिवादन केल्यानंतर उपस्थित परिवारांशी त्यांनी संवाद साधला. नागपूर येथील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या सैनिकी मुलांच्या वसतिगृहात (Military Boys Hostel) कारगिल स्मारक उभारण्यात आले आहे. या स्मारकावर पुष्पगुच्छ अर्पण करून त्यांनी या ठिकाणी जमलेल्या सैनिकांच्या परिवाराशी चर्चा केली. यावेळी त्यांनी श्रद्धांजली सभेमध्ये भाग घेतला. जिल्हा सैनिक कार्यालयामार्फत (District Military Office) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शहीद वीर मातांशी चर्चा करताना त्यांनी जिल्हा सैनिक कार्यालयामार्फत या संदर्भात आलेल्या प्रस्तावावर अतिशय सकारात्मकपणे जिल्हा प्रशासन प्रतिसाद देईल, असे आश्वासन दिले. सगळ्यांनी एकत्रित येऊन नव्या कोणत्या गोष्टी करता येतात या संदर्भातला विचार करावा. महिला भगिनींसाठी प्रशिक्षणापासून तर आवश्यक वस्तूंच्या निर्मितीपर्यंत सर्व क्षेत्रात जिल्हा प्रशासनाला मदत करता येईल. जिल्हा प्रशासनातील सर्व विभाग यासाठी मदत करेल असेही त्यांनी सांगितले.
जखमी जवानाला 20 लाख रुपयांची मदत
यावेळी ‘बॅटल कॅज्युअलिटी रिपोर्ट ‘ वरून रामटेक तालुक्यातील चिचाळा येथील निलेश धरम दमाहे या जखमी जवानाला वीस लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. हा जवान सध्या डेहराडून येथे कार्यरत आहे. जम्मू काश्मीरमध्ये लष्करी कारवाईदरम्यान या जवानाला दुखापत झाली होती. देशांतर्गत सुरक्षा संबंधी कारवाई मोहिमेत सहभागी असताना ही दुखापत झाली आहे. त्यामुळे त्यांना 20 लाखाचा सानुग्रह निधी देण्यात आला. जवानाची पत्नी व त्यांच्या आईने हा धनादेश स्वीकारला. यावेळी जिल्हाधिकारी आर. विमला यांनी जवानाची पत्नी व आई यांच्याशी हितगुज साधले. या कार्यक्रमाला प्रामुख्याने नागपूर जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. शिल्पा खरपकर (निवृत्त), सैनिक कार्यालयातील कर्मचारी, माजी सैनिकांच्या विधवा, माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.