आंतरराष्ट्रीय तिरंदाज खेळाडू काय करतो माहीत आहे का?, वाचा नागपुरातील दिव्यांग खेळाडूचा जीवन संघर्ष
संदीप आता 44 वर्षांचे आहेत. त्यामुळं नोकरीची आशाही मावळली आहे. तरीही एक आशेचा किरण आहे. सरकारी नोकरी अंतिम क्षणी मिळाली तर जादू झाली असे म्हणता येईल.
नागपूर : आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळून संदीप गवई याने देशाला पदक मिळवून दिलं. आता दिव्यांग तिरंदाज (Archer) संदीप गवई चहा विकतोय. संदीप गवई (Sandeep Gawai) यांनी नोकरीसाठी आठ ते दहा वर्षे प्रयत्न केले. पण नोकरी काही मिळाली नाही. अखेर निराश होऊन संदीपने पोटापाण्यासाठी फूटपाथवर चहाची टपरी (Tea Tapari) टाकलीय. राज्य आणि देशाला नावलौकिक मिळवून देणाऱ्या एका पुरस्कारप्राप्त आंतरराष्ट्रीय खेळाडूची ही व्यथा आहे. संदीप गवई पूर्वी लग्नात फेटे बांधायचे. पण कोरोनामुळे लग्न समारंभावर निर्बंध घातल्याने, त्यांचा व्यवसाय मंदावला, त्यामुळे त्यांना आपलं पोट भरण्यासाठी आता चहा विकावा लागतोय. 44 वर्षीय संदीपने तिरंदाज आणि पॉवरलिफ्टर असे दोन खेळात, थायलंड, इटली आणि झेक प्रजासत्ताकमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले.
एकलव्य पुरस्काराने सन्मानित
२०१२ मध्ये बँकॉकमध्ये झालेल्या स्पर्धेत त्याने ब्रॉंझपदक पटकावलं. संदीपच्या या कामगिरीची राज्य शासनाने दखल घेत त्याला प्रतिष्ठेच्या एकलव्य पुरस्काराने सन्मानित केलेय. पण अर्ज करुनंही नोकरी न मिळाल्याने आता त्यांना चहा विकावा लागतोय, असं संदीप गवई याने सांगितलं. संदीपच्या घरी पत्नी, दोन मुले व आजारी आई आहे. त्यांची जबाबदारी संदीपवर आहे. घर चालविण्यासाठी आर्थिक अडचण आहे. कसेतरी जुगाड करून त्यानं पैसे जमा केले. नवीन सुभेदार येथे चहाटपरी टाकली. त्यातून फारसे काही उत्नन्न मिळत नाही. सरकारी नोकरी मिळेल, या आशेवर बरेच सरकारी उंबरठे झिजविले. पण, काही फायदा झाला नाही. दिव्यांगांना 45 वर्षांपर्यंत सरकारी नोकरी मिळू शकते. संदीप आता 44 वर्षांचे आहेत. त्यामुळं नोकरीची आशाही मावळली आहे. तरीही एक आशेचा किरण आहे. सरकारी नोकरी अंतिम क्षणी मिळाली तर जादू झाली असे म्हणता येईल.
फेट्याच्या व्यवसायही बुडाला
कोरोनाने बऱ्याच लोकांची धूळधाण केली. त्यात संदीपचा फेट्याचा व्यवसाय बुडाला. लग्न साधेपणाने साजरे होऊ लागले. मग, फेटे कोण बांधणार? कमीत-कमी लोकांमध्ये लग्नसमारंभ पार पाडले जातात. कोरोनाचे बरेच निर्बंध आहेत. त्यामुळं संदीपच्या फेट्यांच्या व्यवसायावर संक्रांत आली.