नागपूरच्या कारागृहात क्षमतेच्या दुप्पट कैदी, कैद्यांची संख्या वाढल्याने कारागृह व्यवस्थेवर ताण
राज्यातील अनेक कारागृहांची क्षमता वाढवण्यासाठी कारवाई सुरू असल्याचे अमिताभ गुप्ता यांनी सांगितले आहे. पालघर आणि अहमदनगर येथे नवीन कारागृह तयार केले जात आहे.

नागपूर : महाराष्ट्रातील सर्व कारागृहांची एकूण क्षमता ही २४ हजार कैद्यांची आहे. परंतु राज्यातील सर्वच कारागृह कैद्यांनी भरले आहे. सध्या ४२ हजार कैदी शिक्षा भोगत आहेत. जवळजवळ १८ ते २० हजार कैद्यांची संख्या निर्धारित क्षमतेपेक्षा अधिक आहे. त्यामुळे कारागृह व्यवस्थेवर ताण आला आहे. कैद्यांची अतिरिक्त संख्या वाढत असल्याने आलेला ताण कमी करणे गरजेचे आहे. त्यासाठी ज्या जिल्ह्यात कारागृह नाहीत अशा ठिकाणी नवे कारागृह बांधण्याचे नियोजन करण्यात येत आहे. अशी माहिती अतिरिक्त पोलीस महासंचालक (कारागृह) अमिताभ गुप्ता यांनी दिली. ते आज नागपूर दौऱ्यावर आले असताना बोलत होते.
पालघर, नगरमध्ये नवीन कारागृह
राज्यातील अनेक कारागृहांची क्षमता वाढवण्यासाठी कारवाई सुरू असल्याचे अमिताभ गुप्ता यांनी सांगितले आहे. पालघर आणि अहमदनगर येथे नवीन कारागृह तयार केले जात आहे. पुणेच्या येरवडामध्ये ३ हजार कैद्यांसाठी नवे कारागृह तयार केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बंदीवानांच्या सोयी-सुविधेत वाढ
बंदीवानांच्या सोयी सुविधांमध्ये वाढ करणार असल्याची माहिती अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे. कायद्याच्या नियमानुसार बंदीवानांचा जो हक्क आहे, ते त्यांना मिळवून देण्यास प्राधान्य दिले जाईल. कैद्यांची त्यांच्या नातेवाईकांसोबत होणाऱ्या भेटीची वेळ वाढवून देणे, फोन सुविधा देणे, कॅन्टीन सुविधेत सुधारणा करणे, गरम पाणी उपलब्ध करून दिली जाणार आहे.
याशिवाय कारागृहांची सुरक्षा अपग्रेडेशन केले जाणार आहे. दोन हजार अधिक पोस्ट मागवून घेण्यात आल्या आहेत, अशी माहिती अतिरिक्त पोलीस महासंचालक (कारागृह) अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.
बंदीवानांना अध्यात्माकडे वळवण्याचा प्रयत्न
कैद्यांचे नियमित समुपदेशन व्हावे याकरिता अनेक उपक्रम राबवली जात आहेत. त्यामध्ये कैद्यांचे मन आध्यात्मिक क्षेत्राकडे वळवण्याचे प्रयत्न देखील सुरू आहेत. पंढरपूर वारीच्या वेळी कैद्यांची भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. याशिवाय त्यांचे मन आणि शरीर स्वस्थ रहावं याकरिता योगा प्रशिक्षण देखील त्यांना दिले जात आहे.
नागपूरच्या अगदी मध्यभागी असलेले मध्यवर्ती कारागृह हे महाराष्ट्रातील सर्वात जुने कारागृह आहे. येरवडा कारागृहापेक्षा ही दोन वर्ष आधी नागपूर कारागृहाची निर्मिती झाली होती. तरी देखील नागपूर कारागृहा चांगल्या कंडिशनमध्ये आहे. कॅपॅसिटी वाढवण्याची गरज असल्याचे अमिताभ गुप्ता यांनी सांगितले आहे.