मुंबईतील शिंदे गटाचा दसरा मेळावा, पूर्व विदर्भातून इतके हजार कार्यकर्ते जाणार
शिवसेनेला पूर्व विदर्भात एकतरी मंत्रीपद देतील, असं आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी म्हटलं.
गजानन उमाटे, Tv9 मराठी, प्रतिनिधी, नागपूर : मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या गटाचा (Shinde group) दसरा मेळावा (Dussehra gathering) होणार आहे. उद्धव ठाकरे हे शिवाजी मैदानात दसरा मेळावा घेतील. यानिमित्तानं शिवसेनेचे दोन्ही गट शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भातून शिंदे यांच्या मेळाव्यात सुमारे 40 ते 50 हजार लोकं जाणार आहेत, अशी माहिती भंडाऱ्याचे शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी दिली.
मंत्रीमंडळाचा विस्तार अद्याप झाला नाही. यावर बोलताना नरेंद्र भोंडेकर म्हणाले, नाराजी संपूर्ण घरात असते. पण, मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर विश्वास आहे. पूर्व विदर्भात यापूर्वी शिवसेनेला काही मंत्री दिला नव्हता.
सत्तेचा वाटा दिल्याशिवाय विकास होणार नाही. पण, नवीन शिंदे गटाच्या शिवसेनेकडून अपेक्षा आहे. पूर्व विदर्भात एकतरी मंत्रीपद मिळेल. मंत्रीमंडळाचा विस्तार होईल, तेव्हा शिवसेनेला एकतरी मंत्रीपद देतील, असं आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी म्हटलं.
शिंदे गटाचे मंत्री संजय राठोड यांच्याकडूनही बिकेसी मैदानावरील दसरा मेळाव्यासाठी 250 ट्रॅव्हल्स बुक केल्या आहेत. या मेळाव्याला यवतमाळ जिल्ह्यातून 10 हजारांपेक्षा जास्त शिवसैनिक दसरा मेळाव्याला जाणार आहेत, असं नियोजन संजय राठोड समर्थकांनी केले आहे.
माँ जिजाऊंचे घेणार दर्शन
अमरावती जिल्हा, नागपूर जिल्हा आणि यवतमाळ जिल्ह्यातून या ट्रॅव्हल्स बुक केल्या आहेत. चार ऑक्टोबरला सकाळी 11 वाजता मुंबई प्रवासाला सुरुवात होणार आहे. या प्रत्येक ट्रॅव्हल्समध्ये 50 शिवसैनिक राहणार आहेत. सिंदखेडराजा येथे माँ जिजाऊंचे दर्शन घेऊन पुढे प्रवास सुरू केला जाणार आहे.
बाळासाहेब ठाकरे यांचे विचार एकनाथ शिंदे यांच्या तोंडून ऐकण्यासाठी तसेच विकासाचं सोनं लुटायला जिल्ह्यातील शिवसैनिक आतुर आहेत. अशी माहिती संजय राठोड समर्थक शिंदे गटाचे नेते हरिहर लिंगनवार, गजानन बेंजाकिवार यांनी दिली.