अन्न-औषध भेसळमुक्त कसं होईल, मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी सांगितलं
ही अन्नातील भेसळ कमी झाल्यास आजार काही प्रमाणात नियंत्रणात आणता येईल. अन्न पदार्थांच्या गुणवत्ता वाढीबरोबरच राज्यातील जनतेमध्ये अन्न सुरक्षेविषयी जनजागृती करणे गरजेचे आहे.
नागपूर : राज्यात काही ठिकाणी अन्न तर काही ठिकाणी औषधीसुद्धा भेसळ होत आहेत. अन्न दूषित असल्याने आजाराचं प्रमाण वाढलं आहे. शिवाय औषधांच्या कंपन्या त्यातही काठी ठिकाणी भेसळ करत असल्याची ओरड असते. अशावेळी कारवाई करणारी यंत्रणा मर्यादित आहे. त्यामुळे यावर वचक ठेवणे अन्न आणि औषध प्रशासनापुढं मोठं आव्हान आहे. ही अन्नातील भेसळ कमी झाल्यास आजार काही प्रमाणात नियंत्रणात आणता येईल. अन्न पदार्थांच्या गुणवत्ता वाढीबरोबरच राज्यातील जनतेमध्ये अन्न सुरक्षेविषयी जनजागृती करणे गरजेचे आहे. ईट राईट इनिशिएटिव्ह हा उपक्रम त्यासाठीचं राबवण्यात येत आहे. या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश अन्न, औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी आज अधिकाऱ्यांना दिले.
अन्न, औषध भेसळमुक्त करण्यासाठी विभाग कटीबद्ध आहे.त्यासाठी काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश धर्मरावबाबा आत्राम यांनी दिले. रविभवन येथे आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली अन्न, औषध प्रशासनाच्या नागपूर आणि अमरावती विभागाची आढावा बैठक पार पडली.
या आढावा बैठकीला अन्न, औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यु काळे, औषध विभागाचे सहआयुक्त व. तु. पवनीकर, सहआयुक्त (अन्न) ए. पी. देशपांडे यांच्यासह विभागातील अन्न, औषधे सहायक आयुक्त, अन्न सुरक्षा अधिकारी आणि औषध निरीक्षक उपस्थित होते.
ईट राईट इनिशिएटिव्ह
राज्यातील अन्न सुरक्षा कार्यप्रणाली बळकट करण्याकरिता राज्य आणि केंद्र शासनामध्ये करार झाला. त्या करारानुसार राज्यात वर्ष 2023-24 दरम्यान ‘ईट राईट इनिशिएटिव्ह’ राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत क्लीन स्ट्रीट फुड हब, क्लीन अँड फ्रेश फुड अँड व्हेजीटेबल मार्केट, ईट राईट स्कूल, ईट राईट कॅम्पस, हायजिन रेटिंग, फोस्टॅक ट्रेनिंग आदींचा समावेश आहे.
उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना गौरविण्यात येणार आहे. भेसळमुक्त अन्न, औषध मोहिमेसाठी अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन करावे. काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. यावेळी त्यांनी विभागातील सर्व जिल्ह्यांच्या अडचणी आणि मागण्या समजून घेतल्या. अभिमन्यु काळे यांनी अधिकाऱ्यांना विविध विषयांवर सूचना केल्या.
तर स्पॉटवर जाऊन कारवाई करा
अन्न, औषध विभगातर्फे नागपूर आणि अमरावती विभागातील औषध विक्रेत्यांवर करण्यात आलेल्या कार्यवाहीवर अपिलाची सुनावणी धर्मरावबाबा आत्राम यांनी घेतली. यावेळ आत्राम म्हणाले, जे खातो ते हायजेनिकपद्धतीने झालं पाहिजे. तरच माणूस शारीरिक दृष्टीकोनातून चांगला राहू शकेल. भेसळयुक्त अन्नापासून मुक्त झालं पाहिजे. अन्नात भेसळ असेल, तर साईटवर जाऊन कारवाई करावी लागेल, असं अधिकाऱ्यांनी त्यांनी सांगितलं.