Nagpur | आशियाई सॉफ्टबॉल निवड चाचणी स्पर्धेचा समारोप; भारताचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी
महापालिकेच्या सहकार्याने सॉफ्टबॉल असोसिएशन ऑफ इंडियाद्वारे, महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल संघटनेच्या मान्यतेने ही निवड चाचणी घेण्यात आली. भारतीय पुरुष व 23 वर्षाखालील आशियाई सॉफ्टबॉल निवड चाचणी स्पर्धेचा समारोप झाला.
नागपूर : जिल्हाधिकारी आर. विमला (Collector R. Vimala) म्हणाल्या, सॉफ्टबॉल हा क्रिकेटला पर्यायी खेळ आहे. या खेळामधून अनेक खेळाडू पुढे येत नाव लौकिक करीत आहेत. आशियाई सॉफ्टबॉल निवड चाचणी (Asian Softball Selection Test) स्पर्धेसाठी देशाच्या विविध भागातून नागपूर शहरात खेळाडूंनी उपस्थिती दर्शविली. खेळाडूंनी स्पर्धेदरम्यान आपले कौशल्य सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये यश प्राप्त झालेल्या खेळाडूंची आशियाई स्पर्धेसाठी निवड होणार आहे. या खेळाडूंनी आशियाई स्पर्धेमध्ये आपल्या उत्कृष्ट कामगिरीद्वारे देशाचे लौकिक करावे. निवड न झालेल्या खेळाडूंनी निराश न होता आपली कामगिरी उंचावण्यासाठी प्रयत्न करावे, असा सल्ला त्यांनी दिला. विभागीय क्रीडा संकुल, (Divisional Sports Complex) मानकापूर मैदानावर झालेल्या समारोपीय कार्यक्रमात जिल्हाधिकारी आर. विमला, माजी आमदार सुधाकर कोहळे, मनपाचे क्रीडा अधिकारी पीयूष आंबुलकर, इन्स्टिट्यूट सायन्सच्या शारीरिक शिक्षण संचालक डॉ. माधवी मार्डीकर, समाजसेवक चंदनसिंग रोटेले, क्रीडा संघटक अजय हिवरकर, प्रवीण मानवटकर, डॉ. सुरजसिंग येवतीकर, डॉ. विवेक शाहु, केतन ठाकरे, विनोद सुरघुसे, निखिल वाहने आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार
याप्रसंगी गतवर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणा-या देशाच्या विविध भागातील खेळाडूंचा जिल्हाधिका-यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आशियाई सॉफ्टबॉल निवड चाचणी स्पर्धेसाठी भारतातील विविध राज्यातून आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर प्रावीण्यप्राप्त उत्कृष्ट प्रदर्शन केलेल्या सॉफ्टबॉल खेळाडूंनी सहभाग घेतला होता. सदर निवड चाचणीमध्ये सहभागी होऊन आशियाई सॉफ्टबॉल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी खेळाडूंनी आपल्या कौशल्य व क्षमतांची परीक्षा दिली.
आशियाई स्पर्धा सिंगापूरमध्ये होणार
23 वर्षाच्या खालील पुरुष आशियाई स्पर्धा सिंगापूरमध्ये होणार आहेत. या स्पर्धेतील पहिले दोन संघ अर्जेंटिनामध्ये ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या विश्वचषकाच्या स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत. तर वरिष्ठ गट पुरुष आशियाई स्पर्धा जपानमध्ये होणार आहे. त्यातून पात्र होणारे संघ न्यूझीलंडला नोव्हेंबर महिन्यात विश्वचषक स्पर्धा खेळतील. या निवड चाचणीसाठी भारतीय सॉफ्टबॉल संघटनेचे महासचिव एल. आर. मौर्य, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रवीण अनावकर, महाराष्ट्र संघटनेचे सचिव डॉ. प्रदीप तळवेलकर उपस्थित होते.