Nagpur | एम्सच्या संचालकांची बनावट इंस्टाग्राम आयडी!, सायबर गुन्हेगारानं लढवली शक्कल, वाचा काय आहे प्रकरण?
एम्समध्ये नोकर भरती केली जाणार असल्याचं सायबर गुन्हेगारानं या फेक अकाउंटवर लिहिलं आहे. शिवाय नोकरी हवी असल्यास संपर्क साधा, असं सायबर गुन्हेगारानं त्या अकाउंटवर सांगितलंय.
नागपूर : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स)च्या (AIIMS) संचालिका आणि सीईओ डॉ. विभा दत्ता (Dr. Vibha Datta) आहेत. एका सायबर गुन्हेगारानं डॉ. दत्ता यांच्या नावाचं एक बनावट इंस्टाग्राम अकाउंट (Fake Instagram ID) बनवलं. त्यावर नोकर भरतीची जाहिरात टाकली. नोकरीसाठी पैशाची मागणी सुरू केली. ही बाब शुक्रवारी उघडकीस आली.
डॉ. विभा दत्ता यांच्या नावाचा गैरवापर
खरं तर डॉ. विभा दत्ता यांचं इंस्टाग्रामचं अकाउंटचं नाही. पण, त्यांना त्यांच्या ओळखीच्या एका व्यक्तीनं ही बाब लक्षात आणून दिली. माझ्या नावाचा कोणीतही गैरवापर करतो, ही बाब त्यांना समजली. त्यामुळं डॉ. दत्ता यांनी याप्रकरणी सोनेगाव पोलिसांत तक्रार नोंदविली. माझ्या नावाचा आणि पदाचा गैरवापर करून हे खोटं अकाउंट तयार करण्यात आल्याचं त्यांनी तक्रारीत म्हटलं आहे. एम्समध्ये नोकर भरती केली जाणार असल्याचं सायबर गुन्हेगारानं या फेक अकाउंटवर लिहिलं आहे. शिवाय नोकरी हवी असल्यास संपर्क साधा, असं सायबर गुन्हेगारानं त्या अकाउंटवर सांगितलंय. बेरोजगारांना नोकरीचं आमिष दाखविलं. त्यासाठी त्यानं पैशाची मागणी केली. स्वतःचा बँक अकाउंटही त्याठिकाणी नमूद केलाय.
फेक जाहिरातीत दिला बँक अकाउंट नंबर
सायबर गुन्हेगारानं या फेक जाहिरातीत आपला बँक अकाउंट नंबर दिलेला आहे. त्या अकाउंटवर पैसे जमा करण्यास सांगितलंय. नऊ डिसेंबरला डॉ. विभा दत्ता यांच्या ओळखीच्या व्यक्तीनं ही बाब लक्षात आणून दिली. हा गैरप्रकार असल्यानं डॉ. विभा दत्ता यांनी सोनेगाव पोलिसांत याची तक्रार केली. पोलिसांनी याप्रकरणी शुक्रवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय. सायबर शाखेच्या माध्यमातून हे फेक अकाउंट आता बंद करण्यात आलंय. सायबर चौकशी आता पोलिसांनी सुरू केलीय.
बेरोजगारांनी बळी पडू नये
डॉ. विभा दत्ता यांच्या नावाचं कोणतही इंस्टाग्रामवर अकाउंट नाही. शिवाय एम्समध्ये नोकर भरतीची त्याठिकाणी असलेली जाहिरात चुकीची आहे. बेरोजगारांनी खोट्या जाहिरातीला बळी पडू नये, असं आवाहन पोलिसांनी केलंय.