Public Awareness | नागपूर मनपातर्फे अग्निशमन सप्ताह, आगीवर नियंत्रणासाठी शाळांमध्ये प्रात्यक्षिक
नागपूर मनपाच्या अग्निशमन विभागातर्फे अग्निशमन सप्ताह पाळला जात आहे. शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांनी आगीवर नियंत्रण कसे करता येईल, याचे प्रात्याक्षिक दाखविण्यात आले. शिका अग्नी सुरक्षितता, वाढवा उत्पादकता ही यंदाची थीम आहे.
नागपूर : राष्ट्रीय अग्निशमन दिनानिमित्त (National Fire Day) नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागातर्फे 14 ते 20 एप्रिल दरम्यान अग्निशमन सेवा सप्ताह (Fire Service Week) पाळण्यात येत आहे. याअंतर्गत शहरातील नागरिकांमध्ये अग्निशमनविषयी जनजागृती (Public Awareness) करण्याच्या उद्देशाने मंगळवारी (ता. 19) मनपाच्या सर्व अग्निशमन केंद्रातर्फे शहरातील विविध शाळांमध्ये भेट देण्यात आली. शिक्षक व विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिके करून दाखविण्यात आले. सोबतच आगीपासून निर्माण होणारे धोके टाळण्यासाठी घ्यावयाची दक्षता व उपाययोजना बाबत जनजागृती व अग्निशमन यंत्रणेची माहिती देण्यात आली. या जनजागृती कार्यक्रमात मोठ्या संख्येने शिक्षक व विद्यार्थ्यांनी भाग घेऊन स्वतः प्रात्यक्षिके केले. नागपूर मनपाच्या अग्निशमन विभागातर्फे अग्निशमन सप्ताह पाळला जात आहे. शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांनी आगीवर नियंत्रण कसे करता येईल, याचे प्रात्याक्षिक दाखविण्यात आले. शिका अग्नी सुरक्षितता, वाढवा उत्पादकता ही यंदाची थीम आहे.
अग्निशमन यंत्रणेची माहिती
मंगळवारी नरेंद्रनगर अग्निशमन केंद्रातर्फे भगवाननगर येथील साईनाथ विद्यालयात, कॉटन मार्केट अग्निशमन केंद्रातर्फे मिलिंद उच्च प्राथमिक शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांना, लकडगंज अग्निशमन केंद्रातर्फे सी. ए. रोड छाप्रूनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात, गंजीपेठ अग्निशमन केंद्रातर्फे गांधीबाग झोन कार्यालयात जनजागृती करण्यात आली. सक्करदरा अग्निशमन केंद्रातर्फे झोन कार्यालयात नागरिकांना प्राथमिक व स्थायी अग्नीशमन यंत्रणेची माहिती व प्रात्यक्षिके देण्यात आले.
उपाययोजनांबद्दल जनजागृती
याशिवाय त्रिमूर्ती नगर अग्निशमन केंद्र, कळमना अग्निशमन केंद्र, सुगतनगर अग्निशमन केंद्रातर्फे सुद्धा शहरात विविध शाळांमध्ये जाऊन जनजागृती करण्यात आली. यावर्षी अग्निशमन सेवा दिनाची थीम शिका अग्नी सुरक्षितता, वाढवा उत्पादकता ही आहे. या सप्ताहात मनपा क्षेत्रात आगीपासून निर्माण होणारे धोके टाळण्यासाठी घ्यावयाची दक्षता व त्यावरील उपाययोजनांबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येत आहे.