आठ मित्र पिकनिकला गेले, एकमेकांसोबत भरपूर फोटो काढले, मग पाण्यात पोहायला उतरले अन्…
कामाला रविवारी सुट्टी असल्याने आठ मित्रांनी एकत्र पिकनिकला जाण्याचा प्लान केला. मात्र पिकनिकच्या जे घडलं त्यानंतर आठपैकी केवळ तीन जणच परत आले.
नागपूर : सुट्टी निमित्त आठ मित्र तलाव फिरायला गेले होते. मौजमजा करत सर्वजण तलावाच्या परिसरात फिरले. एकमेकांसोबत भरपूर फोटो काढले. मग चार जण तलावात पोहायला उतरले. पण चौघेही पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले. ते पाहून काठावर बसलेले दोघे जण त्यांना वाचवायला गेले. पण ते ही गटांगळ्या खाऊ लागले. काठावर असलेल्या अन्य दोघांनी आरडाओरडा केल्याने स्थानिक नागरिक धावून आले. नागरिकांनी एकाला वाचवले, तर अन्य पाच जणांचा बुडून मृत्यू झाला. याप्रकरणी हिंगणा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ऋषिकेश अनिल पराळे, राहुल अरुण मेश्राम, नितीन नारायण कुंभारे, शंतनू अरमरकर आणि वैभव वैद्य अशी मयत तरुणांची नावे आहेत.
फिरायला गेले आठ जण, पण परतले तीन जण
नागपुरातील पारडी आणि वाठोडा परिसरातील आठ मित्र रविवारी सुट्टी असल्याने मोहगाव झिल्पी परिसरात फिरायला गेले होते. सर्व जण नोकरी करतात. त्यामुळे सुट्टीच्या एकमेकांना भेटता येईल आणि मजा करता येईल म्हणून त्यांनी ही पिकनिक प्लान केली होती. सर्व झिल्पी तलाव परिसरात पोहचले. तेथे भरपूर फिरले, मजा केली, फोटोशूट केले. मग चार मित्रांना तलावात पोहण्याचा मोह झाला.
पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले
चौघेजण पोहायला तलावात उतरले. मात्र त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते गटांगळ्या खाऊ लागले. काठावर बसलेल्या मित्रांनी ते पाहिले आणि दोघे जण त्यांच्या मदतीला पाण्यात उतरले. मात्र ते ही बुडू लागले. यावेळी काठावर असलेल्या दोघांनी आरडाओरडा करुन स्थानिक नागरिकांना गोळा केले. नागरिकांनी तरुणांना वाचवण्यासाठी पाण्यात उड्या घेतल्या. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. वाचवायला गेलेल्या एकाला वाचवण्यास यश आले, मात्र पाच बुडाले.
पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने रात्री उशिरा पाच जणांचे मृतदेह बाहेर काढले. सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. याप्रकरणी हिंगणा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करत, पुढील तपास सुरू केला आहे.