Transport E Buses | नागपूरकरांसाठी 15 ऑगस्टपर्यंत मिळणार 15 वातानुकूलित ई बसेस, 145 ई-बसेससाठी मनपाचे हरियाणाच्या कंपनीला कार्यादेश
नागपुरात दाखल होणाऱ्या सर्व इलेक्ट्रिक बसेस वातानुकूलित राहणार आहेत. या बसेसची बैठक क्षमता 30 सीट्सची असून 15 प्रवासी उभे राहू शकतात. यामध्ये एल.एम.ओ. बॅटरीचा वापर करण्यात आला आहे. सिंगल चार्जिंगवर 150 किमीपर्यंत बस धावू शकते.
नागपूर : नागपूर महापालिकेच्या परिवहन विभागाद्वारे इलेक्ट्रिक बसचा पुरवठा करणाऱ्या हरियाणाच्या पी.एम.आय. कंपनीला 145 इलेक्ट्रिक बसच्या पूर्तीसाठी कार्यादेश देण्यात आले. यानुसार कंपनीतर्फे 15 बसेसचा पुरवठा 15 ऑगस्टपर्यंत केला जाईल. डिसेंबर 2022 पर्यंत उर्वरित बसेसचा पुरवठा केला जाईल. मनपा आयुक्त आणि प्रशासक राधाकृष्णन बी (Radhakrishnan b.) यांच्या प्रमुख उपस्थितीत परिवहन व्यस्थापक तथा उपायुक्त रवींद्र भेलावे (Ravindra Bhelave) आणि कंपनीचे उपाध्यक्ष संजय नागपाल यांनी कार्यादेशाच्या प्रतीवर स्वाक्षरी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त दीपक कुमार मीना (Deepak Kumar Meena) सुद्धा उपस्थित होते. गेल्या दोन महिन्यांत पाच शहर सेवेतील बसेस पेटल्या आहेत. या जुन्या झालेल्या धोकादायक बसेसमधून प्रवास करणे कठीण आहे. या नवीन बसेस केव्हा येतील, याची प्रतीक्षा होती. यासंदर्भात आता करार झाला आहे. त्यामुळं लवकरच ई बसेस नागपूरकरांच्या सेवेत हजर असतील.
100 इलेक्ट्रिक बसेस खरेदी करणे प्रस्तावित
नागपूर महापालिकेतर्फे पर्यावरणपूरक बसेसवर भर देण्यात येत आहे. परिवहन विभागाच्या प्रस्तावानुसार 2022-23 पर्यंत 104.92 कोटी निधीमधून 233 मिडी बसेस खरेदी करणे प्रस्तावित असून 2021-22 पर्यंत प्राप्त 77.52 कोटीमधून पहिल्या टप्प्यात 115 इलेक्ट्रिक बसेस वेटलिजवर खरेदी करण्यात येणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात प्राप्त निधीतून अंदाजे 100 इलेक्ट्रिक बसेस खरेदी करणे प्रस्तावित आहे. हरियाणा येथील पी.एम.आय. कंपनीचे उपाध्यक्ष संजय नागपाल यांनी सांगितले की, चार वर्षांपूर्वी हरियाणामध्ये इलेक्ट्रिक बसेसच्या निर्मितीचा प्लांट उभारण्यात आला आहे. या प्लांटची क्षमता 1500 बसेसचे उत्पादन करण्याची आहे.
बैठक क्षमता 30 सीट्सची
चाकण, पुणे महाराष्ट्रमध्ये सुद्धा 500 कोटीची गुंतवणूक करून बसेसचे उत्पादन करण्याचे प्रस्तावित आहे. कंपनीतर्फे लेह, शिमला, उत्तर प्रदेश, दिल्ली, गुजरात यासह अन्य ठिकाणी बसेसचा पुरवठा करण्यात आला आहे. नागपुरात दाखल होणाऱ्या सर्व इलेक्ट्रिक बसेस वातानुकूलित राहणार आहेत. या बसेसची बैठक क्षमता 30 सीट्सची असून, 15 प्रवासी उभे राहू शकतात. यामध्ये एल.एम.ओ. बॅटरीचा वापर करण्यात आला आहे. सिंगल चार्जिंगवर 150 किमीपर्यंत बस धावू शकते. यावेळी प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे उपस्थित होते.