बसपच्या माजी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षांच्या हाती शिवबंधन, नागपुरात पक्षप्रवेश
सुरेश साखरे यांच्या पक्षप्रवेशावेळी शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. साखरेंसह त्यांच्या जवळपास 150 कार्यकर्त्यांनी हाती शिवबंधन बांधले.
नागपूर : बहुजन समाज पक्षाचे माजी प्रदेश अध्यक्ष सुरेश साखरे (Suresh Sakhare) यांनी शिवबंधन हाती बांधले. नागपुरात जवळपास 150 कार्यकर्त्यांसह साखरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. नागपूरचे शिवसेना संपर्क प्रमुख दुष्यंत चतुर्वेदी (Dushyant Chaturvedi) यांच्या कार्यालयात हा पक्ष प्रवेश झाला. (Former BSP Maharashtra President Suresh Sakhare joins Shivsena in Nagpur)
कोण आहेत सुरेश साखरे?
सुरेश साखरे यांनी बहुजन समाज पक्ष अर्थात बसपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत ते उत्तर नागपूर मतदारसंघातून रिंगणात उतरले होते, मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र महाराष्ट्रात पक्षाचा दारुण पराभव झाल्यानंतर साखरेंना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता.
विधानसभेनंतर पक्षातून निलंबन
महाराष्ट्रभर प्रचार करण्याऐवजी पक्षश्रेष्ठींच्या मर्जीविरुद्ध उत्तर नागपूर मतदारसंघातून निवडणूक लढवली, वैयक्तिक पराजयासोबतच पक्षाचा एकही उमेदवार निवडून आणता आला नाही, असा ठपका ठेवत बसपने त्यांना विधानसभेच्या निकालानंतरच पक्षातून निलंबित केले होते.
नागपूर महापालिका निवडणुकांसाठी रणनीती
दरम्यान, सुरेश साखरे यांच्या पक्षप्रवेशावेळी शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. साखरेंसह त्यांच्या जवळपास 150 कार्यकर्त्यांनी हाती शिवबंधन बांधले. आगामी नागपूर महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेला मोठा फायदा होणार असल्याचं बोललं जात आहे.
चतुर्वेदींच्या नेतृत्वात काँग्रेस पदाधिकारी शिवसेनेत
आगामी नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेने पक्षबांधणीसाठी जोरात प्रयत्न सुरु केले आहेत. याचाच भाग म्हणून शिवसेनेने काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांना आपल्या गळाला लावलं. आधी दुष्यंत चतुर्वेदी काँग्रेसमधून शिवसेनेत आले. त्यानंतर चतुर्वेदी यांच्या नेतृत्वात काँग्रेस कार्यकर्त्यांनी भगवा झेंडा हाती घेतला.
संबंधित बातम्या :
नागपूर शिवसेनेत गटबाजीला ऊत, चतुर्वेदींच्याविरोधात थेट उद्धव ठाकरेंना पत्र
(Former BSP Maharashtra President Suresh Sakhare joins Shivsena in Nagpur)