Nagpur Crime | नागपुरात खंडणी प्रकरणी चार आरोपी जेरबंद, आरोपीने हवालाचे तीस लाख पाठविले?
नागपुरातील व्यापाऱ्याला जेलमधून सोडविण्यासाठी त्याच्या भावाला 60 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. या प्रकरणी चार आरोपीना अटक करण्यात आली आहे. आरोपीने खंडणीचे 30 लाख रुपये हवालामार्फत पाठविल्याचे समोर येत आहे.
![Nagpur Crime | नागपुरात खंडणी प्रकरणी चार आरोपी जेरबंद, आरोपीने हवालाचे तीस लाख पाठविले? Nagpur Crime | नागपुरात खंडणी प्रकरणी चार आरोपी जेरबंद, आरोपीने हवालाचे तीस लाख पाठविले?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/02/07121036/CRIME-2-2-compressed.jpg?w=1280)
नागपूर : सुपारी व्यापारी महेश चंद्र नागरिया याला 27 जानेवारीला पोलिसांनी अटक केली. हा व्यापारी जेलमध्ये होता. मात्र, इंदोर येथील त्याच्या भावाला दोन जणांनी फोन केला. तुझा भाऊ आता जेलमधून बाहेर येऊ शकत नाही. पण, त्याला बाहेर काढायचं असेल तर पोलिसातील वरिष्ठ अधिकारी (Senior Officer) आणि न्यायपालिकेतील वरिष्ठांशी संधान साधावं लागेल. तिथे आमची ओळख आहे. मात्र यासाठी 60 लाख रुपये तुला द्यावे लागतील. सौरभ केसवानी तुझं हे काम करून देईल, असे सांगत त्याच्याकडून 30 लाख रुपये खंडणी घेतली. ते पैसे हवालामार्फत (Hawala) पाठविण्यात आल्याचं पुढे आलं. मात्र इकडे महेश चंद्र नागरिया (Mahesh Nagaria) याला जामीन मिळाला. मात्र आरोपी उर्वरित पैसे मागत होता. मग हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहचलं. या प्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना अटक केली. मात्र मुख्य आरोपी अजून फरार आहे. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी गांभीर्याने घेतला. यात आणखी काही लोकांचा सहभाग आहे का याचा शोध घेत असल्याचं गुन्हे शाखेचे पोलीस मनोज सीडाम यांनी सांगितलं.
सौरभ केसवानीला अटक होणार का?
या सगळ्या प्रकरणाचे तार आता नागपूरच्या बाहेर खानदेशपर्यंत पोहचले आहेत. त्यामुळे यात पोलीस तपासात आणखी काय काय समोर येते हे पाहावं लागणार आहे. अनूप नागरिला पोलिसांनी अटक केल्यानंतर खंडणीबाजांची टोळी सक्रिय झाली. या टोळीच्या जाळ्यात अडकून तीस लाख रुपये वासन वाईनचे शॉप मालक मनोज वंजानी आणि त्याचा भाऊ अशोक वंजानी याच्याकडे देण्यात आले. ती रक्कम मनोज यांच्या मध्यस्तीने देण्यात आल्याची चर्चा आहे. तीस लाखांपैकी पंचेवीस लाखांची रक्क्म रमेश परमार आणि रतन नाना यांच्या मध्यस्तीने जळगाव येथील व्यापारी सौरभ केसवानी याच्याकडे पाठविल्याची माहिती आहे.
दहा-पंधरा आरोपी अडकण्याची शक्यता
या खंडणी प्रकरणात दोन पोलिसांची नावे समोर येत आहेत. त्यामुळं त्यांचे धाबे दणाणले आहेत. या प्रकरणाता जवळपास दहा ते पंधरा आरोपी अडकण्याची शक्यता आहे. जळगावचा सौरभ केसवानी हा हातात लागत नसल्याची माहिती आहे. गुन्हे शाखेने मंगळवारी वासन वाईन शॉपचे संचालक अशोक वंजानी याला ताब्यात घेतले. चाळीसगावचा हवाला कंपनीचा कर्मचारी संतोष मंधानालाही ताब्यात घेण्यात आले. हवाला कंपनीचे कर्मचारी रतन राणा आणि नरेश परमार हे एकवीस फेब्रुवारीपर्यंत पोलिसांच्या ताब्यात आहेत.