NMC scam | पालिकेतील स्टेशनरी घोटाळ्याच्या सुरस कथा! चार रुपयांचा पेन 34 रुपयांना; आणखी कसे वाढत गेले रेट?
मनपासाठी बाजारात आठ हजार 24 रुपयांना मिळणारा कुलर 59 हजार रुपयांना खरेदी करण्यात आलाय. खर तर 59 हजार रुपयांत सामान्य व्यक्ती एसी खरेदी करू शकतो. पण, या किमतीत मनपानं कुलर खरेदी केल्याचे कंत्राटदारानं दाखवलंय. आणि विशेष म्हणजे कंत्राटदाराच्या पैशावर परदेश वारी करणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी त्याला मंजुरी दिली.
नागपूर : नागपूर महापालिकेतील स्टेशनरी घोटाळा चांगलाच गाजतोय. आता घोटाळा नेकमा कसा झाला. त्यात रेट कसे वाढविण्यात आलेत. असे एक-एक खुलासे होत आहेत. हे सारे सामान्य नागरिकांच्या चर्चेचे विषय होत आहेत. त्याचे कारणही तसेच आहे. चार रुपयांच्या पेनची 34 रुपये किंमत लावण्यात आली. मग, इतर वस्तूंचेही असेच चढे भाव लावण्यात आलेत.
वित्त विभागाचा गैरकारभार
मनपाने नऊ जुलै ते 13 ऑक्टोबर या कालावधीत 120 लिटर क्षमतेचा कुलर 79 हजार रुपये दराने खरेदी केला. बाजारात या कुलरची किंमत ८ ते ९ हजारांच्या जवळपास आहे. आठ हजारांचे ऐंशी हजार लावले. त्यालाही या वित्त विभागाच्या गैरकारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांनी मूक संमती दिली. ती केवळ आणि केवळ आपला खिसा गरम होतो म्हणून.
अशा लावल्या अव्वाच्या सव्वा किमती
डॉट जेल पेन बाजारात दोन रुपयांना उपलब्ध आहे. तरी हा पेन प्रति नग साडेनऊ रुपये दराने लावण्यात आला. यु पीन प्लास्टिक कोटेडचे दर 22 रुपये असताना 198 दराने खरेदी करण्यात आलेत. 10 रुपयांची प्लास्टिक फोल्डर बॅग 187 रुपये दराने दाखविण्यात आली. 36 रुपयांची गोंद बॉटल 125 रुपये दराने खरेदी करण्यात आली. स्टेपल पीन पॉकेट सहा रुपयांचे असताना 13 रुपये दराने खरेदी दाखविण्यात आली. हे सारे काही कागदावरच. टेबल रायटिंग स्टँड 1400 रुपये किमत असताना चार हजार 450 रुपये दराने खरेदी करण्यात आले. अशाच प्रकारे अन्य साहित्यही खरेदी करण्यात आलेत. या घोटाळ्याप्रकरणी सभागृहात विषय उपस्थित करण्यात येईल, असे नगसेवक सहारे यांनी सांगितलं.
कोरोना काळात खर्च झालेल्या निधीतही गैरव्यवहार
राज्य शासनाने 2020-21 तसेच 2021-22 मध्ये मनपाला कोरोना महामारीमध्ये उपाययोजना करण्यास 25 कोटी रुपये आपातकालीन सहाय्यता निधीतून दिले. याचीही अशीच विल्लेवाट लावण्यात आली. गेल्या वर्षी कोरोना महामारीमध्ये नागपूर-काटोल मार्गावरील दहेगाव येथील राधास्वामी सत्संग केंद्रामध्ये पाच हजार खाटांच्या रुग्णालयाकरिता खर्च करण्यात आला. शहरातील विविध भागातील प्रतिबंधित क्षेत्र उभारण्यासाठी खर्च झाला. कोरोना महामारीमध्ये निविदा न मागवताच वस्तूंच्या खरेदीकरिता मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आलेला निधी, यामध्येही मोठ्या प्रमाणात तफावत असल्याचा आरोप आमदार विकास ठाकरे यांनी केलाय. स्टेशनरी घोटाळ्यासोबतच राज्य शासनानं मनपाला दिलेला आपातकालीन सहाय्यता निधीचा गैरवापर झालाय. याची देखील शासनाच्या उच्चस्तरीय चौकशी समितीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आमदार विकास ठाकरे यांनी मंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे केली आहे.