Nagpur Crime | नागपुरात सरोगसीच्या नावावर फसवणूक; डॉक्टरने विकले सात लाख रुपयांत नवजात बाळ!
या गोरखधंद्यात काही परिचारिका, महिला डॉक्टर, पॅथोलॉजिस्ट, स्वयंसेवी संस्थेचे पदाधिकारी, महिला व पुरुष दलालांची मोठी साखळी असल्याचा संशय आहे. पोलिसांनी विक्री करण्यात आलेल्या नवजात बाळाला ताब्यात घेतले आहे. संबंधित प्राध्यापक दाम्पत्याचीही चौकशी सुरू आहे.
नागपूर : उपराजधानीतील नवजात बाळाची विक्री करणारे रॅकेट (Baby racket) गुन्हे शाखा पोलिसांनी (crime branch police)उघडकीस आणले. या रॅकेटमध्ये नामांकित डॉक्टरचा समावेश आहो. त्यांच्यासह दोन दलालांना पोलिसांनी अटक केली. या रॅकेटने तेलंगणा राज्यातील प्राध्यापक दाम्पत्याला 7 लाख रुपयांमध्ये नवजात बाळाची विक्री केली. डॉ. विलास भोयर (dr. Vilas Bhoyar), राहुल ऊर्फ मोरेश्वर दाजीबा निमजे आणि नरेश ऊर्फ ज्ञानेश्वर राऊत (शांतीनगर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिघोरीमध्ये ‘क्युअर इट’ नावाने मोठे रुग्णालय आहे. त्याच्या या गोरखधंद्यात काही परिचारिका, महिला डॉक्टर, पॅथोलॉजिस्ट, स्वयंसेवी संस्थेचे पदाधिकारी, महिला व पुरुष दलालांची मोठी साखळी असल्याचा संशय आहे. पोलिसांनी विक्री करण्यात आलेल्या नवजात बाळाला ताब्यात घेतले आहे. संबंधित प्राध्यापक दाम्पत्याचीही चौकशी सुरू आहे.
अनैतिक संबंधातून महिलेने दिला बाळाला जन्म
कामठी तालुक्यातील गुमथळा येथे डॉ. विलास भोयर आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. राहुल निमजे हा त्यांच्याकडे दलाल म्हणून काम करतो. हे दोघेही अनाथ बाळांची खरेदी-विक्री करत असल्याचा पोलिसांचा संशय आहे. हैदराबाद येथील एका दाम्पत्याला मुलंबाळ नव्हते. ते सरोगसीच्या माध्यमातून बाळ घेण्याच्या प्रयत्नात होते. डॉ. भोयर यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी सरोगसीच्या माध्यमातून बाळ मिळवून देण्याचे आश्वासन दिले. पतीचे शुक्राणू मिळविले. दरम्यान, भोयरच्या डॉ. भोयरच्या संपर्कात एक महिला आली. अनैतिक संबंधातून तिला बाळ होणार होते. त्यामुळं ती गर्भपात करण्याच्या तयारीत होती. भोयरने तिला पैशाचे आमिष दाखवून गर्भपात न करण्याचा सल्ला दिला. प्रसुतीनंतर पैसे देण्याचे आमिष गरीब महिलेला दाखविले.
डॉक्टरने दाम्पत्याकडून घेतले सात लाख रुपये
संबंधित महिला नरेश राऊतच्या ओळखीची आहे. त्याने महिलेला प्रसुतीसाठी तयार केले. 28 जानेवारीला महिलेने बाळाला जन्म दिला. या नवजात बाळाची सात लाख रुपयांत हैदराबादच्या दाम्पत्याला विक्री करण्यात आली. तक्रारीच्या माध्यमातून पोलीस आयुक्तांना ही माहिती कळली. त्यांनी गुन्हे शाखेला तापासाचे आदेश दिले. पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रेखा संकपाळ यांनी तपास केला. यात हे उघड झाली. या डॉक्टरकडून यापूर्वीही अशाप्रकारे गुन्हे घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.