Nagpur | पाच रुपयांत परवाना घ्या; 31stला दारु प्या, कसं करणार सेलिब्रेट?
31 डिसेंबरला एका दिवसासाठी एका व्यक्तीला पाच रुपयांत मद्यप्राशन परवाना देण्यात येत आहे, तर पार्टीसाठी तीन हजार ते 30 हजार, अशाप्रकारे शुल्क आकारुन परवाना देण्यात येत आहे.
नागपूर : पाच रुपयांत परवाना घ्या आणि 31 डिसेंबरला दारु प्या… 31 डिसेंबर आणि नव वर्षाचा आनंद साजरा करताना मद्यप्रेमी तयारीला लागलेत. नागपूर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून या मद्यपीसांठी ॲानलाईन आणि ॲाफलाईन परवाण्याची सोय करण्यात आलीय. 31 डिसेंबरला एका दिवसासाठी एका व्यक्तीला पाच रुपयांत मद्यप्राशन परवाना देण्यात येत आहे, तर पार्टीसाठी तीन हजार ते 30 हजार, अशाप्रकारे शुल्क आकारुन परवाना देण्यात येत आहे.
मद्याचे घोट घेत अनेकजण 31 डिसेंबर साजरा करतात. नव वर्षाचं स्वागत करतात. या मद्यप्रेमींसाठी नागपूर राज्य उत्पादन शुल्क विभागाने तयारी केलीय. यासाठी ॲानलाईन आणि ॲाफलाईन परवान्यांची सोय आहे. एका व्यक्तीला 31 डिसेंबर ला दारु पिण्यासाठी पाच रुपये शुल्क आकारुन परवाने देण्यात येत आहे. अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क नागपूर अधिक्षक प्रमोद सोनोने यांनी दिलीय.
विदेशी मद्यावरील उत्पादन शुल्कातही कपात
राज्य सरकारनं आयात केलेल्या स्कॉच, व्हिस्कीसह काही मद्यावरील उत्पादन शुल्कात 50 टक्के कपात केली आहे. या निर्णयामुळं राज्यात विक्री केल्या जाणाऱ्या स्कॉच, व्हिस्कीची किंमत इतर राज्यांतील किंमतीएवढी झाली आहे. दर कमी केल्यानं अवैध विक्रीला आळा बसणाराय. शिवाय महसुलात वाढ होणार असल्याचा दावा शासनाचा आहे. आयात केलेल्या स्कॉचच्या विक्रीतून राज्याला शेकडो कोटींचा महसूल मिळतो. या शुल्क कपातीमुळे सरकारचा महसुलात 200 ते 250 कोटींची भर पडण्याची अपेक्षा आहे. दर कमी करण्याच्या निर्णयामुळं राज्यातील आयात मद्याचे दर कमी झालेत. राज्य शासनानं मद्याचे दर निश्चित केलेत. कंपन्यांकडून नव्या सुधारित दरानुसार मद्य विक्री होणार आहे. नव वर्षाला होणार जल्लोष लक्षात लवकरच या नव्या दराचे मद्य बाजारात येणार असल्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तविण्यात येत आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दारुविक्रीत वाढ
मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी विक्रीत वाढ झाली. यंदा एप्रिल ते ऑक्टोबर या 7 महिन्यांत 2 कोटी 4 लाख लिटरच्यावर मद्याची विक्री झाली. यातून 254 कोटी 82 लाख 8 हजार रुपयांचा महसूल शासनाला मिळाला. यात सर्वाधिक 1 कोटी 32 लाख लिटरवर देशीचा समावेश आहे. तर 70 लाख 80 हजार लिटर विदेशी मद्याची विक्री झाली. मागील वर्षी याच काळात विक्री ही दोन कोटी लिटर पेक्षा कमी होती. तर 248 कोटी 70 लाख 9 हजारांचा महसूल मिळाला होता.