नागपूर : वीजबिलांच्या दुरूस्तीमधून आतापर्यंत तीनशे कोटी 24 लाख रुपयांचे समायोजन करण्यात आले आहे. शेतकर्यांकडे वीजबिलांपोटी तीस हजार 705 कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यापैकी पन्नास टक्के थकबाकी 31 मार्चपर्यंत भरल्यास उर्वरित 50 टक्के म्हणजे रुपयांची माफी मिळणार आहे. वीजबिलांबाबत तक्रार (Complaint regarding electricity bills) किंवा शंका असल्यास कृषीपंपधारकांनी त्याचे निराकरण करावे. या योजनेचा लाभ सर्व थकबाकीदारांनी घ्यावा, असे आवाहन व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल (Managing Director Vijay Singhal) यांनी केले आहे. कृषीपंप वीजबिलांच्या थकबाकीमुक्ती योजनेला (Arrears Relief Scheme ) चांगला प्रतिसाद मिळत आहे. मंगळवार 23 फेब्रुवारीपर्यंत 21 लाख 79 हजार 816 शेतकर्यांनी चालू वीजबिल व थकबाकीची काही रक्कम भरली. त्यांना सहा हजार 769 कोटी 50 लाख रुपयांची सवलत मिळाली आहे.
आतापर्यंत सुधारित थकबाकीची एकूण पन्नास टक्के रक्कम व चालू वीजबिल भरण्यात आले. राज्यातील तीन लाख 97 हजार 199 शेतकर्यांनी वीजबिल संपूर्णपणे भरले आहे. त्यांना उर्वरित पन्नास टक्के थकबाकीची 571 कोटी 88 लाख रुपयांची सवलत मिळाली आहे. या योजनेत पुणे प्रादेशिक विभागामध्ये सात लाख 27 हजार 637 शेतकरी सहभागी झालेत. यातील दोन लाख 9 हजार 638 शेतकरी थकबाकीमुक्त झाले आहेत.
या योजनेमध्ये नागपूर प्रादेशिक विभागात तीन लाख 43 हजार 207 शेतकरी सहभागी झालेत. 60 हजार 938 थकबाकीमुक्त झालेत. तर औरंगाबाद प्रादेशिक विभागात सहभागी चार लाख 89 हजार 687 पैकी 17 हजार 29 शेतकरी थकबाकीमुक्त झाले आहेत. कोकण प्रादेशिक विभागात सहभागी सहा लाख 19 हजार 285 पैकी 1 लाख 9 हजार 594 शेतकरी थकबाकीमुक्त झाले आहे.