पावसाचा अंदाज तरीही एपीएमसी मार्केटमधील धान्य भिजलं; व्यापाऱ्यांनी धान्य झाकून का ठेवलं नाही?
दोन दिवसांपूर्वी हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट जारी केला होता. असं असताना एपीएमसी प्रशासनानं हे बाहेर ठेवलेलं धान्य झाकलेलं नाही.
नागपूर : नागपुरात अवकाळी पावसाचा फटका बसलाय. कळमना एपीएमसी मार्केटमध्ये धान्य पावसात भिजलं. रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे व्यापाऱ्यांचं धान्य भिजलं. काल झालेल्या लिलावाचं धान्य पोत्यात भरुन ठेवण्यात आलं होतं. काही धान्य ताडपत्रीने झाकण्यात आलं, तर काही धान्य पावसात भिजलं. हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवला असतानाही व्यापाऱ्यांनी धान्य झाकून का ठेवलं नाही? असा प्रश्न निर्माण होत आहे. कळमना एपीएमसी मार्केटमध्ये धान्याचं नुकसान झालं आहे. अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. एपीएमसी मार्केट प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. शेतकऱ्यांना याचा भुर्दंड सहन करावा लागत आहे.
चना, गहू पावसात भिजला
रात्री अवकाळी पाऊस झाला. त्यात एपीएमसी मार्केटमधील गहू, चना आणि इतर धान्य उघड्यावर होतं ते भिजलं. या भिजलेल्या धान्याला आता भाव मिळणार नाही. एका शेतकऱ्यानं चना, गहू विक्रीसाठी आणले होते. पण, रात्री पाऊस आला. त्यात हे धान्य भिजलं. त्यामुळे या भिजलेल्या धान्याला योग्य भाव मिळणार नसल्याचं शेतकरी म्हणाला. दोन दिवसांपूर्वी हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट जारी केला होता. असं असताना एपीएमसी प्रशासनानं हे बाहेर ठेवलेलं धान्य झाकलेलं नाही. पु्न्हा पाऊस आल्यात या नुकसानीत भर पडणार आहे.
एपीएमसी प्रशासनावर कारवाई नाही
जेव्हा -जेव्हा अवकाळी पाऊस येतो, तेव्हा कळमना एपीएमसी मार्केटमधील धान्य भिजतं. परंतु, एपीएमसी प्रशासनावर कारवाई होत नाही. धान्य भिजलेलं आहे. उघड्यावर ठेवलेलं आहे. आपल्या देशात हजारो लोकांना दोन वेळचं जेवण मिळत नाही. येथील प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नासाडी होत आहे. आधीच सुलतानी धोरणांमुळे राज्यातील शेतकरी संकटात आहे. शेतमालाला योग्य भाव मिळत नाही.
गोंदियातही पावसाचा अंदाज
गोंदिया जिल्ह्यात एलो व ऑरेंज अलर्ट असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यंदा फेब्रुवारी महिन्यापासून उन्हाने आपला तडाखा वाढविला आहे. फेब्रुवारी महिन्यात पारा ३६ अंशावर गेला होता. त्यात आता होळी जळाली. उन्हाचा तडाखा वाढत असतानाच होळीच्या दिवसापासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. त्यात आता हवामान खात्याने येत्या १५ ते १९ या पाच दिवसांत विजेचा कडकडाट आणि वादळवाऱ्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अलर्ट राहणं गरजेचं आहे.